जायकवाडीसाठी विसर्गामुळे शेतीला झळ; गंगापूर धरण जलसाठा ८९ टक्क्यांवर येण्याची शक्यता

हा विसर्ग झाल्यानंतर गंगापूर धरणातील जलसाठा आठ टक्क्यांनी कमी होऊन ८९ ते ९० टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.

नाशिक : समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून ३१४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असून त्याची झळ मुख्यत्वे नाशिक, निफाड, इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील शेतीला बसणार आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह काश्यपी, गौतमी गोदावरी या धरणांमधून ५०० दशलक्ष घनफूट तर उर्वरित २६४३ दशलक्ष घनफूट पाणी आळंदी, कडवा, भाम, भावली, दारणा, मुकणे आणि वालदेवीतून सोडण्यात येणार आहे. पालखेड धरण समुहात कमी जलसाठा असल्याने त्यातून पाणी सोडले जाणार नाही. हा विसर्ग झाल्यानंतर गंगापूर धरणातील जलसाठा आठ टक्क्यांनी कमी होऊन ८९ ते ९० टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाने विसर्गाची तयारी सुरू केली आहे. ती पूर्णत्वास गेल्यानंतर दोन, तीन दिवसात धरणांमधून विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. यंदा पर्जंन्यमान कमी राहिल्याने अनेक भागातून जायकवाडीला पाणी देण्यास विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर, धरणातून पाणी सोडताना यंत्रणेला बरीच दक्षता घ्यावी लागणार आहे. नदी काठावरील गावातील वीज पुरवठा बंद करणे, पोलीस बंदोबस्त, बंधाऱ्यांतील फळ्या काढणे आदी पूर्वतयारी केली जाणार आहे. ही तयारी झाल्यानंतर विसर्गाबाबत निश्चितपणे काही सांगता येईल, असे नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

पालखेड धरण समुहात सध्या ७९६१ दशलघ घनफूट (९६ टक्के) जलसाठा आहे. या समुहातून पाणी सोडण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. या समुहातून पाणी सोडले जाणार नसल्याने या समुहाच्या जलसाठ्यात घट होणार नाही. जायकवाडीसाठी जिल्ह्यातील ३१४३ दशलक्ष घटफूट पाणी सोडले जाणार आहे. याचा फटका पाच ते सहा तालुक्यातील शेतीला बसणार आहे.

विसर्गानंतरची स्थिती काय ?

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहातून ०.५ टीएमसी म्हणजे ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे. सध्या धरणात सुमारे साडेपाच हजार दशलक्ष घनफूट म्हणजे ९७ टक्के जलसाठा आहे. विसर्गानंतर तो पाच हजार दशलक्ष घनफूटवर येईल. म्हणजे तेव्हा धरणात ८९ ते ९० टक्के पाणी राहण्याचा अंदाज आहे. गोदावरी दारणा समुहातून यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल २६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाईल. सध्या आळंदी (सध्याचा जलसाठा ९८ टक्के), कडवा (१०० टक्के), भावली (१००), दारणा (९९ टक्के), मुकणे (९४ टक्के), वालदेवी (१०० टक्के) जलसाठा आहे. दारणा धरण समुहात सध्या ९२ टक्के जलसाठा आहे. जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर या समुहातील जलसाठा अंदाजे १५ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे.

हे वाचले का?  अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

चार वर्षानंतर विसर्ग

जायकवाडीत पुरेसा जलसाठा न झाल्यास वरच्या भागातील धरणांमधून पाणी द्यावे लागते. यापूर्वी २०१८ मध्ये ही परिस्थिती उद्भवली होती. त्याआधी २०१५ व २०१२ साली पाणी सोडावे लागले होते. २०१८ मध्ये गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. समन्यायी तत्वावरून पाणी वाटपावरून नाशिक-नगर आणि मराठवाड्यात संघर्ष ठरलेला आहे. तेव्हा निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विसर्ग बंद पाडला होता. त्यामुळे जे पाणी देणे अपेक्षित होते, तितके पाणी सोडता आले नव्हते. त्याची भरपाई दारणा धरणातून करावी लागली होती. २०१८ मध्ये गोदावरी दारणा धरण समुहातून ३२४० दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

अपव्यय किती होणार ?

पावसाळ्यानंतर बहुतांश नदीपात्रातील पाण्याचा स्तर खाली गेला आहे. नदीपात्रात पाणी कमी असताना धरणातून विसर्ग केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. सर्वसाधारणपणे अशा पध्दतीने पाणी सोडताना ३० ते ४० टक्के अपव्यय गृहीत धरलेला असतो. मागे जेव्हा पाणी सोडले होते, तेव्हा ६० टक्के पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचले होते, असा दाखला पाटबंधारे विभागाचे अधिकारी देतात. यावेळी किती पाण्याचा अपव्यय होईल, हे सोडलेले पाणी जायकवाडीत पोहोचल्यानंतर उघड होईल.