जिल्ह्यात १२ दिवस कठोर टाळेबंदी जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाता येणार नाही. संबंधित दुकाने केवळ घरपोच सेवेसाठी खुली असतील.

बाजार समित्या, आठवडे बाजार बंद; अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध

नाशिक : कडक निर्बंध लागू करूनही करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने १२ ते २३ मे या कालावधीत १२ दिवसांसाठी शहरासह जिल्ह्यायात पूर्णत: टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. या काळात अत्यावश्यक वा वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. किराणा मालासह बेकरी, मिठाई दुकाने ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहतील. हीच कालमर्यादा घरपोच दूध वितरणास असेल. या टाळेबंदीतून औषध, प्राणवायू निर्मिती उद्योगांना वगळण्यात आले आहे. अन्य उद्योग जे मनुष्यबळाची कारखान्यात किं वा लगत निवास, भोजनाची व्यवस्था करतील त्यांना सुरू राहण्याची मुभा असेल. या सूचनांचे पालन न करणारे उद्योग बंद राहतील.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केल्यानंतर फारसा प्रभाव पडला नाही. मध्यंतरी सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी सध्या ती ३३ हजारहून अधिक आहे. तीन, चार दिवसात यात फारशी घट होत नसल्याने आढावा बैठकीत चिंता व्यक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर, सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये, पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.  करोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवस कठोर टाळेबंदी लागू करण्यावर बैठकीत एकमत झाले. बुधवारी दुपारी १२ वाजेपासून ते २३ मेच्या रात्री १२ पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. खासगी, सार्वजनिक वैद्यकीय सेवा, दवाखाने, औषध दुकाने २४ तास सुरू राहतील. नागरिकांना अत्यावश्यक किं वा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

हे वाचले का?  अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाता येणार नाही. संबंधित दुकाने केवळ घरपोच सेवेसाठी खुली असतील. घरपोच माल पुरविण्याची जबाबदारी दुकानांवर टाकण्यात आली आहे. दूध संकलन, वितरण सकाळी करता येईल. सायंकाळी पाच ते सात ही वेळ केवळ संकलनासाठी राहील. बस, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी वापरता येईल. इ कॉमर्सद्वारे घरपोच सेवा देणाऱ्यांना नकारात्मक चाचणी अहवाल सोबत बाळगावा लागेल. गॅस एजन्सीद्वारे घरपोच सिलिंडर वितरण सुरू राहील. सर्व बँका, पतसंस्था, टपाल कार्यालये नागरिकांसाठी सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत सुरू असतील. कृषी अवजारे, कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने कालमर्यादेत सुरू ठेवता येणार आहेत. अंत्यविधीसाठी २० आणि त्यानंतरच्या विधीसाठी १५ व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक कामासाठी असणाऱ्यांना इंधन मिळेल.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, बगीचे बंद राहतील. शाळा, महाविद्यालय, शिकवणी पूर्णत: बंद राहील. ऑनलाइन शिक्षणास प्रतिबंध नाही. मंगल कार्यालये, स्वागत समारंभ, सभागृह, लॉन आणि तत्सम ठिकाणे बंद राहणार आहेत. लग्न सोहळा केवळ नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात करता येईल. तेव्हा पाचपेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, नाट्यगृह, कला केंद्र, सभागृह बंद राहणार आहेत. सर्व शासकीय कार्यालयात अभ्यागंतासाठी बंद राहतील. ऑनलाइन सेवा सुरू राहतील.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया