जिल्ह्य़ात दमदार पावसाचा अभाव

रिपरिपीमुळे पिकांवर रोग पसरण्याचा धोका; यंदा २७६९ मिलीमीटर कमी पाऊस

नाशिक : राज्यातील अनेक भागात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यावर मात्र तो अद्याप रुसलेलाच असल्याचे चित्र आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात १०७ मिलीमीटर पाऊस पडला. मंगळवारी दुपापर्यंत परिस्थिती फारशी बदललेली नव्हती. अधुनमधून होणारी रिपरिप वगळता मुसळधार पाऊस झालेलाच नाही. पावसाच्या रिपरिपीमुळे पिकांवर रोग पसरण्याचा धोका आहे. तीन महिन्यांपासून चाललेला पावसाचा लपंडाव अखेरच्या टप्प्यातही कायम राहतो की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे.

काही भागांचा अपवाद वगळता कुठेही पूरस्थिती निर्माण झालेली नाही. एरवी सप्टेंबपर्यंत गंगापूरसह बहुतांश धरणे तुडूंब भरून ओसंडून वाहतात. गोदावरीला तीन-चार वेळा पूर येतो. हे वर्ष मात्र त्यास अपवाद ठरले. गोदावरी एक-दोन वेळा दुथडी भरून वाहिली असली तरी पूर मात्र आलेलाच नाही. हवामानशास्त्र विभागाने नुकत्याच दिलेल्या अंदाजामुळे आता तरी मुसळधार पाऊस येईल, अशी अपेक्षा सारे बाळगून आहेत. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधुनमधून रिपरिप झाली.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

प्रशासनाच्या माहितीनुसार २४ तासात १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या तालुक्यात पावसाचे अस्तित्व नव्हते. नाशिक, पेठ, बागलाण, निफाड, येवला आणि मालेगाव तालुक्यात तुरळक पाऊस झाला. नांदगावमध्ये ४५, कळवण १५, सुरगाणा तालुक्यात २० मिलीमीटर पाऊस झाला. एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत आतापर्यंत १० हजार ८७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात १३ हजार ६४३ मिलीमीटर पाऊस झाला होता. याचा विचार करता यंदा २७६९ मिलीमीटर कमी पाऊस झाला आहे.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के कमी

दमदार पावसाअभावी यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. सद्यस्थितीत लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये ६७ टक्के साठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ८७ टक्के इतके होते. म्हणजे धरणांतील जलसाठा २० टक्क्यांनी कमी आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सध्या ९१ टक्के जलसाठा आहे. या हंगामात एखादा अपवाद वगळता गोदावरी नदी दुथडी भरून वाहिलेली नाही. कश्यपी धरणात ६७ टक्के, गौतमी गोदावरी ७३, आळंदी १००, पालखेड ८८, करंजवण ४२, वाघाड  ७३, ओझरखेड ३२, पुणेगाव ५५, तिसगाव १५, दारणा ९३, भावली १००, मुकणे ५८, वालदेवी १००, कडवा ९९, नांदूरमध्यमेश्वर ९९, भोजापूर २४, चणकापूर ९०, हरणबारी १००, केळझर ९२, नागासाक्या ८२, गिरणा ४८, पुनद ९३ आणि माणिकपुंज धरणात १०० टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ४४ हजार २२४ दशलक्ष घनफूट म्हणजे ६७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ५१ हजार १८२ दशलक्ष घनफूट म्हणजे ८७ टक्के जलसाठा होता.