जीएसटी संकलन १.६१ लाख कोटींवर

सरलेल्या जूनमध्ये एकूण १,६१,४९७ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली.

नवी दिल्ली :वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन जूनमध्ये १२ टक्के वाढून १.६१ लाख कोटींवर पोहोचले. गेल्या वर्षी जूनमध्ये ‘जीएसटी’तून १.४४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. जीएसटी संकलनाने १.६० लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची गेल्या सहा वर्षांतील ही चौथी वेळ आहे.  

सहा वर्षांपूर्वी म्हणजे १ जुलै २०१७ रोजी अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू झाल्यानंतर आतापर्यंत जीएसटी संकलनाने चौथ्यांदा १.६० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. 

सरलेल्या जूनमध्ये एकूण १,६१,४९७ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली. यंदाच्या महसुलात, केंद्रीय वस्तू व सेवा करापोटी (सीजीएसटी) ३१,०१३ कोटी रुपये, राज्य वस्तू व सेवा करापोटी (एसजीएसटी) ३८,२९२ कोटी रुपये, तर एकात्मिक वस्तू व सेवाकरापोटी ८०,२९२ कोटी रुपये (आयात वस्तूंवर जमा केलेल्या ३९,०३५ कोटी रुपयांसह) आणि ११,९०० कोटी रुपये उपकरातून (माल आयातीवर जमा झालेल्या १,०२८ कोटी रुपये उपकरासह) जमा झाले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत सरासरी मासिक जीएसटी संकलन अनुक्रमे १.१० लाख कोटी, १.५१ लाख कोटी आणि १.६९ लाख कोटी होते. जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत १४ वेळा ते १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. तर जीएसटीची अंमलबाजवणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाचव्यांदा जीएसटी संकलन १.५० लाख कोटी रुपयांहून अधिक आणि चौथ्यांदा १.६० लाख कोटींहून अधिक नोंदवले गेले आहे.

हे वाचले का?  अनुसूचित जाती, जमातींतही ‘क्रीमिलेयर’ हवे; घटनापीठातील चार न्यायमूर्तींची महत्त्वाची सूचना

राज्यात २६ हजार कोटी

मुंबई : राज्यात जूनमध्ये २६ हजार कोटींचे जीएसटी संकलन झाले. त्यात मेच्या तुलनेत अडीच हजार कोटींनी वाढ झाली आहे. मेमध्ये २३,५३६ कोटी, तर जूनमध्ये २६,०९८ कोटी संकलन झाले. एप्रिलमध्ये ३३,१९६ कोटी एवढे संकलन झाले होते. आर्थिक वर्षांअखेर मोठय़ा प्रमाणावर परतावे सादर केले जात असल्याने दरवर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक संकलन होते. दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकात ११,१९३ कोटींचे संकलन झाले. गुजरातमध्ये १०,११९ कोटी, तर तमिळनाडूमध्ये ९६०० कोटींचे संकलन झाले.