“जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना एकदा इशारा दिला. “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं”, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चांगलांच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी अनेकदा उपोषणही केलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. मात्र, त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांसदर्भात लक्ष्मण हाके यांनी जनआक्रोश यात्रा सुरु केलेली आहे. सध्या मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा तापला आहे.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

अशातच मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एका प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मला कारागृहात टाकल्यास भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीत पाडा, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा दिला. “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

एका प्रकरणात त्यांना अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना हे माहिती नाही की याआधी १३ ते १४ वर्षात काहीच झालं नाही. मग असं अचानक काय झालं? मग मीच का? असे राज्यात किती गुन्हे आहेत? कारण दोन्हीही खाते तुमच्याकडे आहेत. मी गोरगरीबांसाठी लढतो म्हणून तुम्ही मला हेरलं का?”, असा सवाल जरांगे यांनी केला.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

“मला याबाबत आधी नोटीस दिली नव्हती. मी कायद्याचा सन्मान करणारा माणूस आहे. न्यायालयाचा अवमान कधीही आम्ही होऊ दिला नाही आणि पुढेही होऊ देणार नाहीत. पण आता आधी नोटीस दिली नाही, थेट वॉरंट काढलं. बर वॉरंट जरी काढलं असलं तरी त्या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. माझा संबंध नसला तरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांचा मला उघडं पाडण्याचा हा प्रयत्न आहे. पण त्यांनी हे काम करू नये, आमचे लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावू नये. आता तुम्ही जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहिल, मी आता एवढंच सांगतो”, असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.