“झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप

मतपेढीच्या राजकारणासाठी बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीला सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखालील आघाडी सरकारने प्रोत्साहन दिले.

पीटीआय, जमशेदपूर
मतपेढीच्या राजकारणासाठी बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीला सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखालील आघाडी सरकारने प्रोत्साहन दिले. हे घुसखोर संथाल परगणा आणि कोल्हान प्रदेशांसाठी मोठा धोका बनले आहेत. या प्रदेशांची लोकसंख्या झपाट्याने बदलत असून, आदिवासी लोकसंख्या घटत आहे. झारखंडमधील प्रत्येक रहिवाशाला आता असुरक्षित वाटत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गोपाल मैदानावर भाजपच्या ‘परिवर्तन महारॅली’त केला.

पंतप्रधान मोदी रविवारी हेलिकॉप्टरने जमशेदपूरला येणार होते. परंतु प्रतिकूल हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण करू न शकल्याने त्यांना रस्ते मार्गाने जमशेदपूर येथे जावे लागले. महारॅलीला संबोधित करताना ते पुढे म्हणाले, की झारखंडमधील सरकारच घुसखोरांना पाठिंबा देत आहे. शेजारील देशातील बेकायदेशीर स्थलांतरितांनी राज्यातील सत्ताधारी पक्षावर प्रभाव वाढवला आहे. हे घुसखोर पंचायत व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याबरोबरच जमिनी बळकावत आहेत, तसेच राज्यातील मुलींवर अत्याचार करत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला. राज्यात बांगलादेशी स्थलांतरितांची घुसखोरीचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र पॅनेल स्थापन करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. परंतु या घुसखोरीची कबुली देण्यास नकार दिल्याबद्दल मोदींनी झारखंड सरकारवर टीका केली.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

जेएमएम, राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेस हे झारखंडचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. हे पक्ष सत्तेचे भुकेले आणि मतपेढीच्या राजकारणात गुंतल्याचा हल्लाबोल मोदी यांनी केला. काँग्रेसने नेहमीच या राज्याचा द्वेष केला, तसेच येथील आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले. तर ‘राजद’ अजूनही झारखंडच्या निर्मितीचा सूड घेत असल्याची टीका मोदी यांनी केली.

हे वाचले का?  Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

झारखंडशी भाजपचे विशेष नाते आहे आणि स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी भाजपचे मोठे योगदान आहे. येथील आदिवासी तरुणांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप करत भाजप सरकारनेच विशेष योजना आणून त्यांना शिक्षण व नोकऱ्या मिळवून दिल्याचा दावा मोदी यांनी या वेळी केला. भाजपनेच ४०० हून अधिक एकलव्य शाळा स्थापन केल्या, तसेच एका आदिवासी महिलेला भारताचे राष्ट्रपती बनवले, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.