झेलेन्स्कींना भेटण्यासाठी बायडेन थेट युक्रेनला जाणार? रशियाला देणार मोठा धक्का?; व्हाइट हाऊस म्हणालं, “राष्ट्राध्यक्षांचा…”

रशियाने युक्रेनवर हल्ला करुन ५० दिवसांहून अधिक कालावधी उटला असून येथील संघर्ष दिवसोंदिवस अधिक तीव्र होत आहे

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे युद्धग्रस्त युक्रेनला भेट देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला ५० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून आता थेट बायडेन हे युक्रेनमध्ये जाऊन युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. हा रशियासाठी मोठा धक्का असणार आहे, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत. बायडेन यांच्या युक्रेन भेटीसंदर्भात तर्क वितर्क लढवले जात असतानाच आता यासंदर्भात थेट व्हाइट हाऊसनेच स्पष्टीकरण जारी केलं आहे.

बायडेन यांच्या संभाव्य युक्रेन दौऱ्याची शक्यता व्हाइट हाऊसने फेटाळून लावलीय. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची किव्हमध्ये भेट घेण्यासंदर्भात बायडेन यांचा कोणताही विचार नसल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) यासंदर्भातील खुलासा केल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलंय.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

“राष्ट्राध्यक्षांचा असा कोणताही दौरा नियोजित करण्यात आलेला नाहीय,” असं उत्तर पास्की यांनी बायडेन प्रशासन अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतने एक विशेष उच्च स्तरीय बैठक थेट किव्हमध्ये घेणार असल्याच्या प्रश्नावर दिलंय. यापूर्वी अमेरिकेने युक्रेनला ८०० मिलियन अमेरिकन डॉलर्स किंमतीची लष्करी मदत देणार असल्याची घोषणा केलीय. यामध्ये वॉशिंग्टनने मोठ्या आकाराची शस्त्र पुरवणार असल्याचं स्पष्ट केलं असून पूर्व युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात रशियाकडून हल्ल्यांची शक्यता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मदत दिली जाणार आहे.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

आतापर्यंत अमेरिकने चार विमानांमधून युक्रेनला सुरक्षेसंदर्भातील मदतीचं सामान पाठवलं असून आज पाचवं विमान पाठवल जाणार आहे असं पास्की म्हणाल्यात. “एकूण चार विमानांमधून या आठवड्याच्या शेवटी युक्रेनला मदत पाठवण्यात आलीय. आणखी एक विमान आज रवाना होणार आहे,” असं पास्की यांनी म्हटलंय.

युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या ३० देशांपैकी अमेरिका हा सर्वाधिक शस्त्र पुरवणारा देश आहे. जानेवारी २०२१ मध्ये बायडेन यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर अमेरिकन सरकाने युक्रेनला सुरक्षेसंदर्भात ३.२ बिलियन अमेरिकी डॉलर्सची मदत करण्याचा निर्णय घेतल्या. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत २.६ बिलियन डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आलाय. अमेरिकेकडून युक्रेनला केल्या जाणाऱ्या मदतीमध्ये अॅण्टी एअरक्राफ्ट मिसाइल्स, जेव्हलीन अॅण्टी आर्मोर सिस्टीम्स, होवत्झर्स, एमआय १७ हेलिकॉप्टर्स, छोटी शस्त्र, दारुगोळा, ड्रोन, रडार्स अशा गोष्टींचा समावेश असल्याचं स्पुटनिक या रशियन वृत्तसंस्थेनं म्हटलंय.