टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या अब्जाधीशांचा दुर्दैवी मृत्यू, जहाजाजवळ सापडले पाणबुडीचे तुकडे

महासागराच्या तळाशी असलेल्या टायटॅनिक या जहाजाचे अवशेष पर्यटकांना दाखवण्यासाठी गेलेली एक पाणबुडी उत्तर आटलांटिंक समुद्रात हरवली होती.

तब्बल ११२ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागराच्या तळाशी हरवलेल्या टायटॅनिक या अजस्र जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली टायटन ही पाणबुडी चार दिवसांपासून बेपत्ता होती. केवळ ९६ तास पुरेल इतका प्राणवायूचा साठा घेऊन ही पाणबुडी रविवारी (१८ जून) समुद्राच्या तळाशी झेपावली होती. परंतु काहीच तासांनी या पाणबुडीचा संपर्क तुटला. त्यानंतर ही पाणबुडी बेपत्ता झाली. अमेरिकेसह कॅनडाच्या नौदलाने तसेच पाणबुडी ऑपरेट करणाऱ्या कंपनीने ही पाणबुडी शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पाणबुडीचा शोध लागला नाही. अखेर या पाबुडीतील लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पाणबुडी ऑपरेट करणारी कंपनी ओशिएनगेटने दिली आहे. कंपनीने या पाणबुडीतल्या पाचही प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शोधमोहिमेवर गेलेल्या पथकाला टायटॅनिक जहाजाच्या जवळ बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. तज्ज्ञांचं एक पथक आता इतर तपास करत आहे. कॅनडाच्या एका जहाजावर असलेल्या रोबोटने ही बेपत्ता पाणबुडी शोधून काढली आहे.

या पाणबुडीवर पायलट, ब्रिटिश साहसी नागरिक, धनाढ्य पाकिस्तानी कुटुंबातील दोन सदस्य आणि अन्य एका प्रवाशाचा समावेश होता. हे सर्वजण अब्जाधीश होते. यामध्ये ओशिएनटगेटचे सीईओ स्टॉकटन रश, शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हामिश हार्डिंग आणि पॉल हेनरी नार्जियोलेट यांचा समावेश होता. ही पाणबुडी १८ जून रोजी टायटॅनिकच्या शोधात गेली होती. टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचणं, तिथे फिरणं आणि परत येणं या सगळ्या गोष्टींसाठी आठ तास लागतात.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

१९१२ मध्ये अटलांटिक महासागरातील हिमनगाला धडकून बुडालेल्या टायटॅनिक या अजस्र जहाजावरील दीड हजाराहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या जहाजाच्या अवशेषांचा शोध पहिल्यांदा १९८५ मध्ये लागल्यापासून त्याची पाहणी करण्यासाठी, अभ्यासासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. मात्र, आता जहाजाचे अवसेषही नष्ट होऊ लागले असून त्याआधी संशोधन पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार