ठरलं! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जाणार इस्रायल दौऱ्यावर, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Joe Biden on Israel Visit : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात फोनवरून दीर्घ चर्चा झाली असल्याची माहितीही अँटनी ब्लिंकेन यांनी दिली.

Joe Biden on Israel Visit Marathi News : इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल लष्कराने जमिनीवरील कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे तेथील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. या युद्धात अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शवला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, युद्धाची धग वाढत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उद्या (१८ ऑक्टोबर) इस्रायल दौऱ्यावर जाणार असून इस्रालयला पाठिंबा दर्शवणार आहेत. अमेरिकेचे राज्य सचिव अँटनी ब्लिंकेन यांनी यासंदर्भात आज (१७ ऑक्टोबर) माहिती दिली. इस्रायलच्या तेल अवीव शहराला ते भेट देणार आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात फोनवरून दीर्घ चर्चा झाली असल्याची माहितीही अँटनी ब्लिंकेन यांनी दिली. तसंच, गाझा पट्टीवर इस्रायल आक्रमण करणार आहे, त्यापार्श्वभूमीवर अमेरिका इस्रायलच्या सोबत असल्याची ग्वाही देण्याकरता जो बायडेन इस्रायल दौऱ्यावर जात आहेत.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

हमास आणि इतर दहशतवादी संघटनांविरोधात स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार इस्रायलला आहे, ही भूमिका बायडेन जाहीर करणार आहेत. तेल अवीव शहरात इस्रायल युद्ध मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर ब्लिंकन यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. दरम्यान, हल्ल्याचा सायरन वाजल्यामुळे ब्लिंकन यांनाही पाच मिनिटांसाठी बंकरमध्ये लपून राहावं लागलं होतं.

युद्धाची रणनीती ठरवणार

युद्धाची रणनीती, युद्धाच्या हेतूविषयी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू बायडेन यांना सविस्तर माहिती देणार आहेत. तसंच, युद्धादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरवणे, गाझामधील नागरिकांना मानवतावादी सुविधा पुरवणे आदी मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. गाझामधील नागरिकांना मानवतावादी सुविधा पुरवण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल यांनी मान्यता दिली असून यासाठी अनेक राष्ट्र मदत करणार आहेत, अशी माहितीही ब्लिंकन यांनी दिली.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

पॅलेस्टाईनसाठीही मार्ग हवा – बायडेन

हमास या संघटनेचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे, मात्र त्याचवेळी पॅलेस्टाईन राज्यासाठी मार्ग असला पाहिजे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी व्यक्त केले. या संघर्षांमध्ये इस्रायल युद्धाचे नियम पाळेल अशी आशाही बायडेन यांनी ‘६० मिनिट्स’ला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. या युद्धामध्ये अमेरिकेने आपले सैन्य पाठवणे आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम आशियाई देशांमधील अशांततेमुळे अमेरिकेत दहशतवादाचा धोका वाढल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

१० लाखांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचं स्थलांतर

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यापूर्वी गाझा पट्टीतून १० लाखांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांनी घर सोडून दुसरीकडे स्थलांतर केले आहे. तर इस्रायलच्या जमिनीवरील कारवाईमुळे मानवतावादी संकट अधिक तीव्र होऊ शकते, असा इशारा युद्धभागात मदत पुरवठा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी दिला आहे. अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशांनीही याबद्दल आता चिंता व्यक्त केली आहे.