“…तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला एकत्रित करून ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे”, गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली आहे.

अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं आहे. यानंतर आयोगानं ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह बहाल केलं आहे. दुसरीकडे, शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाला पत्र लिहिलं आहे. आमच्याबरोबर दुजाभाव केला जात असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

उद्धव ठाकरेंच्या या पत्रानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह देऊन चूक केली आहे. आयोगानं त्यांना ‘खंजीर’ हे चिन्ह द्यायला पाहिजे होतं, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राबाबत विचारलं असता गोपीचंद पडळकर म्हणाले, “उद्धव ठाकरेंबरोबर कसला दुजाभाव केला आहे? खरं तर, निवडणूक आयोगाकडे आम्हीच विनंती करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचं विलीनीकरण करून त्यांना ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना लोकांमध्ये सहजपणे जाता येईल. कारण ‘मशाल’ चिन्ह रुजवायला त्यांना वेळ लागेल. ‘खंजीर’ म्हटलं तर लोकांच्या लगेच लक्षात आलं असतं.

हे वाचले का?  Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

“मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच खंजीरातून झाला आहे. आता पवारांनी नवीन एक खंजीर घुसवणारा निर्माण केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडूनच चूक झाली, असं मला वाटतंय. मी स्वत: एक पत्र लिहून विनंती करतो की, त्यांचं चिन्ह बदलून त्यांना ‘खंजीर’ चिन्ह द्या. पण तुम्हाला खंजीर चिन्ह मिळाल्यानंतर ते एकमेकांच्यात घुसवू नका, समोरच्यात घुसवा” असा टोलाही गोपीचंद पडळकरांनी लगावला आहे.

हे वाचले का?  Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”