चुकीला माफी नाही, संजय राऊतांचं सूचक विधान
शिवसेना भवन तोडण्याची भाषा केल्यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत यांनी जर त्यांच्या खांद्यावरुन भाजपा बंदूक चालवत असेल तर मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चुकीला माफी नाही असं सूचक विधानही केलं आहे.
“अशी विधानं करुन लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपामध्येही या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना भवन ही फक्त एक इमारत नसून मुंबई, महाराष्ट्राची रक्षणकर्ता असलेली वास्तू आहे. जे स्थान हुतात्मा स्मारकाला आहे, त्याच भावना लोक शिवसेना भवनाविषयी व्यक्त करतात. ती वास्तू बाळासाहेब ठाकरेंची आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलले की एक झापड दिली तर उठणार नाहीत. हे पक्षप्रमुखांचं वक्तव्य आहे. सामनातही आम्ही सांगितलं आहे. स्वत:च्या पायावर याल आणि खांद्यावर जावं लागेल. ज्यांनी अशी भाषा आणि घाणेरडा विचार केला त्यांचं काय झालं याच्या नोंदी इतिहासात आहेत,” असंही संजय राऊतांनी म्हटलं.
“हा भाजपाचा विचार आणि भूमिका असूच शकत नाही. काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस कोणीही शिवसेना भवन, बाळासाहेबांबद्दल असं बोलणार नाही. आमच्यातल राजकीय मतभेद नक्कीच असतात जे आम्ही व्यासपीठांवर, मीडियामध्ये, निवडणुकांमध्ये व्यक्त करत असतो. शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी मुंबई, महाराष्ट्राचे लढे लढले आहेत. शिवसेना भवनाने अनेक जखमा अंगावर घेतल्या आहेत. मुंबईतल्या बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांना शिवसेना भवनाखाली बॉम्ब ठेवून उडवण्याचा प्रयत्न केला. अतिरेकी घुसण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रखर राष्ट्रवादाचं प्रतिक असलेली ही इमारत आहे. ते तोडण्याची भाषा नतद्रष्टे आणि बाटगेच करु शकतात,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“सत्ता नसल्यामुळे बाटग्यांना झटके येत आहेत. कारण सत्ता मिळेल म्हणून काही लोक त्या पक्षात गेले आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून काही लोक असे उद्योग करत असतील तर भाजपाला फार मोठी किंमत या लोकांमुळे मोजावी लागेल असं माझं स्पष्ट मत आहे. याआधी ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ल्याचा प्रयत्न केला ते शिल्लक राहिलेले नाहीत,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही असं सांगताना दिलगिरी व्यक्त केली ठीक आहे, पण चुकीला माफी नाही असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.
संजय राऊत यांनी राज्यसभेचं कामकाज होत नाही यासाठी सरकारच जबाबदार असून त्यांनीच कोंडी फोडली पाहिजे सांगत सरकराचीच कामकाज चालवण्याची इच्छा नसल्याचा आरोप केला. दरम्यान यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी गेटवर अदानी एअरपोर्ट बोर्ड लावण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच आहे. शिवसेनेने त्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यामुळे कोणा उद्योगपतींच्या नावे विमानतळ ओळखलं जाणार असेल तर मान्य नाही. ते महाराजांच्या नावेच ओळखलं जावं”.