“मोदी सरकारने २०१४ पासून आतापर्यंत पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून एकूण १७ लाख ३१ हजार २४२ कोटींची कमाई केली आहे. पण आता पंतप्रधान मोदी कर कपातीसाठी राज्यांना जबाबदार धरत आहेत”, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या विधानानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगाल यासारख्या बिगर भाजपा शासित राज्यात पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे संबंधित राज्यातील नागरिकांना दिलासा मिळेल, असंही ते म्हणाले होते.
पण पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “पंतप्रधान मोदी याचं विधान एकांगी असून लोकांना संभ्रमात टाकणारं आहे. त्यांनी बैठकीत सांगितलेले तथ्य खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर सबसिडी देत आहोत. यासाठी आम्ही एकूण १५०० कोटी रुपये खर्च केले आहेत”, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “पंतप्रधान मोदी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात करण्याचं आवाहन करत आहेत. पण केंद्र सरकारकडे आमची ९७ हजार कोटींची थकबाकी आहे. केंद्राने यातील आर्धी रक्कम जरी दिली, तरी आम्ही कर कमी करू. नागरिकांच्या हिताचा विचार करून त्यांना त्वरित ३ हजार कोटींची सबसिडी देऊ. सबसिडी देण्यासाठी मला काहीही अडचण नाही. पण केंद्राकडे थकबाकी असल्याने राज्य सरकार कसं चालवायचं?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला आहे.
“मोदी सरकारने २०१४ पासून आतापर्यंत पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून एकूण १७ लाख ३१ हजार २४२ कोटींची कमाई केली आहे. पण आता पंतप्रधान मोदी कर कपातीसाठी राज्यांना जबाबदार धरत आहेत”, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.