अफगाणिस्तानमधील सत्तेचा ताबा घेतल्यानंतर तालिबान लवकरच सरकार स्थापन करणार असून संपूर्ण जगाचं याकडे लक्ष लागलं आहे
अफगाणिस्तानमधील सत्तेचा ताबा घेतल्यानंतर तालिबान लवकरच सरकार स्थापन करणार असून संपूर्ण जगाचं याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान तालिबान अमेरिकेला डिवचत दहशतवादी हल्ल्याची आठवण करुन देणाऱ्या ९/११ रोजीच सरकार स्थापन करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता दबावामुळे ताबिलानकडून ११ सप्टेंबरला सरकार स्थापनेचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहेत. रशियामधील TASS न्यूज एजन्सीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. १६ ऑगस्टपासून तालिबानने देशामधील सत्ता काबीज केली आहे.
११ सप्टेंबर २०२१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण होत आहेत. याच तारखेला २० वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली हल्ला केला होता. त्यानंतरच अमेरिकेने आपल्या लष्करासहीत अफगाणिस्तानवरील तालिबानच्या तळांवर हल्ला करत पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार होतं. अमेरिकने त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर घडवून आलं होतं. हा संघर्ष २० वर्षे चालला अखेर अमेरिकने मागील आठवड्यामध्ये आपलं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेत असल्याची घोषणा केलीय. याच सर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तालिबान आता पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची घोषणा ९/११ करुन अमेरिकेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात होतं.
“काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान सरकार स्थापनेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. लोकांमध्ये कोणतंही गोंधळाचं वातावरण असू नये यासाठी नेतृत्वाने मंत्रीमंडळाच्या काही भागाची घोषणा केली असून त्यांनी काम सुरुदेखील केलं आहे,” अशा माहिती अफगाणिस्तान सरकारमधील सांस्कृतिक मंत्री इनामुल्ला यांनी दिली आहे.
तालिबानने सरकार स्थापनेच्या कार्यक्रमात रशिया, इराण, चीन, कतार आणि पाकिस्तानला निमंत्रण दिलं होतं. रशियाने मात्र कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता.
अफगाणिस्तानला एकटे पाडल्यास गंभीर परिणाम – कुरेशी
अफगाणिस्तानला आताच्या परिस्थितीत एकटे पाडून कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानबाबत सकारात्मक दृष्टिकोन अवलंबावा असे सांगून ते म्हणाले की, अफगाणिस्तानला जर जगाने वेगळे पाडण्याचे प्रयत्न केले तर त्याचे फार गंभीर परिणाम अफगाणी लोकांवर तसेच जगावर होतील.
कुरेशी यांनी स्पॅनिश परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युअर अल्बारेस हे शुक्रवारी इस्लामाबादेत आले असून त्यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. अफगाणिस्तानला वेगळे पाडले तर त्याचे गंभीर परिणाम होतील ते अफगाणी लोकांना धोक्याचे आहे. जगही त्या परिस्थितीमुळे धोक्यात येईल. आपण अफगाणिस्तानबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.आंतररराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानातील नवीन वास्तव लक्षात घेतले पाहिजे. तालिबानशी शांततेसाठी वाटाघाटी करण्याची गरज आहे. कुरेशी यांनी सांगितले की, हा मानवतेच्या पातळीवरचा पेच असून जीनिव्हात या देशासाठी निधी उभारण्यासाठी परिषद होत आहे याचे समाधान आहे.