तीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था

पावसाळ्यात या इमारतींना गळती लागली.

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा :    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वाडा तालुक्यातील पाली गावात तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शासकीय शाळा आणि वसतिगृहाच्या नव्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट बांधकाम आणि देखरेखीचा अभाव असल्याने ही स्थिती ओढवली आहे. शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि वसतिगृहासाठी तीन वर्षांपूर्वी तीन मजली दोन भव्य इमारती बांधलेल्या आहेत.  तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे.

पावसाळ्यात या इमारतींना गळती लागली. ती लपविण्यासाठी टाळेबंदीतही एका इमारतीवर घाईघाईत पत्र्याचा मंडप टाकला आहे. गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पालीतील शाळा आणि वसतिगृहाच्या इमारतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार उघडेच ठेवण्यात आले आहे. वर्गखोल्यांचे दरवाजेही खुले ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत, तर इमारतीतील प्रसाधनगृहात अस्वच्छता आहे. येथे ६५० निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

कामे करावीच लागतात

या आश्रमशाळेच्या झालेल्या दुरवस्थेकडे जव्हार प्रकल्पाने दुर्लक्ष करून याच इमरतीलगत  ५० लाख रुपये खर्च करून नव्याने प्रसाधनगृह बांधण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी असलेल्या दोन्ही इमारतींमध्ये ४० हून अधिक प्रसाधनगृहे असताना नव्याने वेगळ्या प्रसाधनगृहासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी का केली जात आहे, असे जव्हार प्रकल्प कार्यालयातील बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एम. पाटील यांना विचारले असता, ही कामे वरिष्ठ पातळीवर मंजूर होतात, ती आम्हाला करावीच लागतात असे उत्तर दिले.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

या आश्रमशाळेच्या दुरवस्थेला येथील स्थानिक प्रशासन जबाबदार आहे. करोनाकाळात विद्यार्थ्यांना सुटी असली, तरी येथील शिक्षकांनी दुर्लक्ष केल्याने ही स्थिती ओढावली आहे.