“…तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची डोकी भरकटली”; तंत्र-मंत्र, करणीचा उल्लेख करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरुन सेनेचा टोला

महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ सरकारने पुकारला आहे काय? असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला

राज्यातील कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांसंदर्भात केलेलं विधान आणि त्यावरुन झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या कामाख्या देवीच्या दर्शनाचा उल्लेख करत टोला लगावला आहे. “शिंदे गटाने गुवहाटीमध्ये नक्की कोणाच्या विरोधात जारण-मारण केले?” असा प्रश्न उपस्थित करताना “शिंदे गटाच्या गुवहाटी दौऱ्यानंतर भाजपाच्या मंत्री आणि पुढाऱ्यांची डोकी भरकटली आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ सरकारने पुकारला आहे काय? अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे.

“कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट”

“‘त्या काळात सरकार अनुदान देत नसतानाही डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या. आता मात्र संस्थाचालक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात,’ असे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या महापुरुषांनी ‘भीक’ मागितली हे पाटलांचे विधान आता वादाचे कारण ठरले आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री त्यांच्या वाचाळकीमुळे रोजच स्वतःचे हसे करून घेत आहेत व महाराष्ट्राचीही बदनामी करीत आहेत. मिंधे गटाचे मंत्री शंभू देसाई यांनी संजय राऊत यांना सरळ धमकी दिली की, ‘तुम्ही परखड बोलणे थांबवले नाही, तर पुन्हा तुरुंगात टाकू.’ शंभू देसाई यांनी ही दमबाजी चंद्रकांत पाटील, शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल, भाजपाचे आमदार यांच्यासारख्यांना केली पाहिजे. आंबेडकर, फुले, कर्मवीर पाटील यांना भिकारी म्हणणाऱ्यांना व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू, असे हे शंभू देसाई का गर्जत नाहीत? हा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का? नपेक्षा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसता,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

हे वाचले का?  सांगली : नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने १७ जणांचे स्थलांतर

“तुझ्यासाठी वेगळी शाळा मी काढीन, असे आश्वासन देऊन…”

“चंद्रकांत पाटील हे तर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. पाटील यांच्या विधानाचे पडसाद बहुजन समाजात उमटू लागले आहेत. ते पिंपरीतील घटनेवरून दिसले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर पाटील यांनी ‘लोकवर्गणी’तून संस्था उभ्या केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत सांगायचे तर, बहुजन समाजाला इतरांच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे, जाती-जमातीचे भूत गाडले गेले पाहिजे या विचाराने त्यांनी सातारच्या माळरानावर ज्ञानयज्ञ उभा केला व जगभरात नेला. ईश्वरपूरमधील (इस्लामपूर) एका शाळेत एक दलित मुलगा बाहेर बसलेला भाऊरावांनी पाहिला. ‘अस्पृश्य मुलाला वर्गात घेता येणार नाही.’ हे शिक्षकांचे उत्तर ऐकून संतप्त झालेले भाऊराव त्या मुलाला घेऊन घरी आले व तुझ्यासाठी वेगळी शाळा मी काढीन, असे आश्वासन देऊन त्यांनी त्या मुलाची तात्पुरती व्यवस्था कोल्हापूरच्या ‘मिस क्लार्क हॉस्टेल’मध्ये केली,” अशी आठवण या लेखात सांगण्यात आली आहे.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

त्यामुळे कर्मवीरांनी संस्था चालवण्यासाठी भीक मागितली हे बोलणे बरोबर नाही

“रयत शिक्षण संस्थेचा हा उगम ठरला व १९२४ मध्ये एका हरिजन विद्यार्थ्याला बरोबर घेऊन भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेची ही मुहूर्तमेढ ठरली. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा निघाली पाहिजे या ईर्षेने जवळ जवळ ५५० शाळा त्यांनी सुरू केल्या. सातारचे विद्यार्थी बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. त्यांची सोय व्हावी म्हणून खुद्द लंडनला महात्मा गांधी वसतिगृह काढले. गरिबीमुळे व जातीच्या अडचणीमुळे शिक्षण मिळाले नाही ही गोष्ट त्यांनी शिल्लक ठेवली नाही. पुन्हा देणग्या मिळतील त्यांची नावे द्यायची असा देखावा कधी केला नाही. त्यामुळे कर्मवीरांनी संस्था चालवण्यासाठी भीक मागितली हे बोलणे बरोबर नाही,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!