“तेव्हा अजित पवार बारामतीत सायकलवर…”, शरद पवारांबाबत केलेल्या त्या विधानावर संजय राऊतांची टीका

बारामतीत एका सभेला संबोधित करत असताना उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवरी टीका केली. काहीजण शेवटची निवडणूक सांगून भावनिक करतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली.

बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेवटच्या निवडणुकीसंदर्भात विधान केले. “बारामती लोकसभेसाठी मी उमेदवार देणार आहे. पण काही लोक ही शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद घालतील, त्यामुळे मी निवडणुकाला उभा आहे, असे समजून आपल्या उमेदवाराला मत द्या”, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. या विधानातून शरद पवार यांच्या मरणाची अजित पवार वाट पाहत आहेत का? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनीही अजित पवारांविरोधात टीकास्र सोडले आहे.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

अजित पवार लांडग्याच्या भूमिकेत

“अजित पवार इतके निर्दयी होतील, असे मला वाटलं नव्हतं. ज्या ताटात पवार साहेब आणि प्रतिभा पवार या माऊलीनं आपल्याला खाऊ-पिऊ घातलं. आपल्याला ओळख, प्रतिष्ठा दिली, त्यांच्याच संदर्भात असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. नव्या कळपात गेल्यापासून तुम्ही लांडग्याच्या भूमिकेत शिरलेले आहात. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात. पण आज तुम्ही जे काही आहात, तुमची जी ओळख आहे, तुम्ही जी कोट्यवधीची माया जमवून राज्य करत आहात, ते याच नेत्यांमुळे”, अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांवर केली.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

तेव्हा अजित पवार सायकलवर फिरत होते

संजय राऊत पुढे म्हणाले, “अजित पवार लोकांना सांगत होते की, पंतप्रधान मोदी मला ओळखतात. मी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी गेल्यावर ते मला स्मितहास्य देतात. पण त्याच मोदींनी तुमच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी जोरदार हल्ला केला होता. आता मोदी हसतात म्हणून तुम्हाला गुदगुल्या होतात का? जर शरद पवार नसते, प्रतिभा पवार नसत्या तर अजित पवार तुम्हाला ओळखही मिळाली नसती. अजित पवार बारामतीत सायकलवर फिरताना मी पाहिलं आहे. पण माणसानं कृतघ्न असता कामा नये. तुम्ही रामभक्त आहात ना, मग रामाची कृतज्ञता शिका. मग मोदींचे गोडवे गा. तुम्हाला मोदी ओळखत असले तरी आम्ही मोदींना जास्त ओळखतो.”

अजित पवार यांचे कालचे वक्तव्य महाराष्ट्राच्या जनमाणसामध्ये अस्वस्थतता निर्माण करणारे आहे. एका कुटुंबातील व्यक्ती सत्तेसाठी किती कृतघ्न होऊ शकते, हे काल महाराष्ट्रानं पाहिलं आणि हे विष जनतेच्या मनात पेरण्याचे काम भाजपाने केलं आहे. महाराष्ट्र भाजपाला कधीही माफ करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले