“…तेव्हा आम्ही गप्प बसलो”, शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयाबाबत अजित पवारांचं मोठं विधान

शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयावर अजित पवार यांनी सूचक भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

तसेच शरद पवारांनी २०१४ साली भाजपाला दिलेल्या पाठिंब्याचा पुनरुच्चारही अजित पवारांनी केला. ते सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला? यावरही भाष्य केलं.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी, आपली कामं होण्यासाठी, बहुजन समाज, वंचित, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे. आज ४५-५० आमदार अशी भूमिका घेतात, हे साधी गोष्ट नाही. आम्हीही ३०-३५ वर्षे समाजकार्य-राजकारण केलं आहे. आम्हीही वरिष्ठांचा मान राखला आहे. वरिष्ठांचा आदर केला आहे. वरिष्ठांनी जे सांगितलं त्याची अंमलबजावणी केली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे.”

हे वाचले का?  Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!

शरद पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत अजित पवार पुढे म्हणाले, “२०१४ साली आमच्या वरिष्ठांनी (शरद पवार) भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा आम्ही गप्प बसलो. त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. अशा अनेकदा घटना घडल्या आहेत. त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यातूनच आम्ही ही भूमिका स्वीकारली.”