‘तो’ प्रस्ताव दिल्लीत का रखडला हे भाजपाने जनतेला सांगावं; संजय राऊतांचा थेट सवाल

राज्यात नामांतराच्या मागणीनं धरला जोर

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यात यावं, अशी मागणी भाजपानं लावून धरली आहे. औरंगाबाद महापालिकेची लगबग सुरू झाल्यानंतर नामांतराचा हा मुद्दा पुढे आला असून, नामांतराच्या मुद्द्याभोवती राज्यातील राजकारण फेर धरताना दिसत आहे. भाजपाकडून औरंगाबादच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपालाच उलट सवाल केला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले,”औरंगाबाद आणि संभाजीनगर याबद्दल शिवसेनेची भूमिका काय आहे, हे भाजपाला माहिती आहे. काँग्रेसलाही माहिती आहे. अबू आझमींना माहिती आहे. एमआयएमलाही माहिती आहे. औरंगाबादचं नामांतर ३० वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. त्याच्यावर आता सरकारी सही शिक्का उमटायचा आहे. खरं म्हणजे भाजपाच्या काळात हे व्हायला हवं होतं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

“भाजपानं नामांतराची फार चिंता करू नये. त्यांनी यावरून राजकारण करणं सोडून द्यावं. त्यांनी शिवसेनेला विचारण्यापेक्षा जे संभाजीनगर नावाला विरोध करताहेत त्यांना विचारायला हवा. तुम्ही विरोध का करता, असं विचारलं पाहिजे. पण ते प्रश्न विचारत आहेत शिवसेनेला,” असं राऊत म्हणाले.

“संभाजीनगरचं (औरंगाबाद) जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. औरंगाबाद विमानतळ असं ज्याला म्हणतात. त्या विमानतळाचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करा, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केंद्राकडे पाठवलेला आहे. भाजपाने दिल्लीत जाऊन विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव का रखडला? का होत नाही? याबद्दल राज्यातील जनतेला खुलासा करावा,” अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

हे वाचले का?  Nana Patole : “काँग्रेसमध्ये नानाभाऊ-विजयभाऊ; एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती”, जुन्या सहकाऱ्याची बोचरी टीका

राज्यात नामांतराच्या मागणीनं धरला जोर

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी पुढे आल्यानंतर राज्यात नामांतराची लाटच आली आहे. अनेक शहरांची नावं बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. तर अहमदनगर, सिंधूदूर्ग जिल्ह्याचं नावंही बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महाराष्ट्रचंच नाव बदलण्याची मागणी केली आहे.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…