..त्यांनीच विश्वासघात केला!

शीतल आमटे यांच्या जन्मदिनी पती गौतम यांची भावनिक ‘पोस्ट’

‘‘तू आयुष्यभर ज्यांची काळजी घेतली त्यांनीच विश्वासघात केला. आता पुढच्या जन्मात तरी पोटच्या मुलीची काळजी असेल अशाच  घरात तुझा पुनर्जन्म होईल, अशी मला आशा आहे. त्या घरात तुला आईवडिलांचा स्नेह, प्रेम मिळो. तू बाबा आणि ताईंच्या तत्त्वांचे तंतोतंत पालन करीत होतीस. तू जिथे कुठे असशील तिथे तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा’’, अशा शब्दांत डॉ. शीतल आमटे यांच्या जन्मदिवशी त्यांचे पती गौतम करजगी यांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांनी ३० नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. शीतल यांच्या जन्मदिवशी २६ जानेवारी रोजी पती गौतम करजगी यांनी समाज माध्यमांवर एक भावनिक ‘पोस्ट’ लिहिली. त्यात ते म्हणतात, ‘‘तू आज माझ्यासोबत नाही, यावर माझा विश्वास बसत नाही. तुला जन्मदिवसाच्या अशा पद्धतीने शुभेच्छा द्याव्या लागतील, असे कधीही वाटले नाही. ४० वर्षांनंतर आपण कसे जगायचे, याबाबत तू अनेक कल्पना रंगविल्या होत्या. आयुष्य जगताना वर्षे मोजत जाण्यापेक्षा आयुष्य कसे जगायचे यावर तुझा सदैव भर होता. शीतल तू झगमगता तारा होतीस. हा तारा नेहमी असाच चकमत राहील. तू मला आनंदवनाशी घट्ट जोडले. जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. तू एक उत्तम मुलगी, मैत्रीण, पालक, आई आणि पत्नी होती. तू बाबा व ताईंच्या तत्त्वांचे आयुष्यभर पालन केले. मात्र तुला आयुष्यभर ज्यांची काळजी होती, त्यांनीच आपला विश्वासघात केला’’, अशा  शब्दांत गौतम करजगी यांनी आमटे कुटुंबीयांवर नाव न घेता टीका केली.

हे वाचले का?  सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन

या पोस्टसोबतच शीतल यांच्या कार्याची ओळख करून देणारी पाच मिनिटांची एक चित्रफीतही त्यांनी जोडली. सहा वर्षांच्या मुलाचाही त्यात उल्लेख होता.