त्र्यंबकेश्वर देवस्थानचे दरवाजे आजपासून उघडणार

मंदिरात दर्शन तसेच पूजेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही भाविक वर्षभर येत असतात.

लसीकरण न झालेल्यांना करोना चाचणी अनिवार्य

नाशिक : शासन निर्णयानुसार राज्यातील मंदिरे गुरुवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुली होत आहेत. या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून भाविक येणाऱ्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीनेही मंदिर सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कार्यालयात विश्वस्तांची बैठक पार पडली. बैठकीत देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, नाशिक जिल्हा न्यायालयाचे वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक अशोक दारके, तहसीलदार दीपक गिरासे,

पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष समीर पाटणकर आणि विश्वस्त दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

मंदिरात दर्शन तसेच पूजेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही भाविक वर्षभर येत असतात. भाविकांची या काळात होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनाने आता आवश्यक उपाययोजनांवर भर दिला आहे. यामध्ये मंदिर सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले राहील. शासकीय नियमांनुसार ६५ वर्षांपुढील आणि १० वर्षांआतील बालकांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही.

लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आवश्यक आहेत. तसे नसेल तर मागील ७२ तासातील आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. नि:शुल्क धर्मदर्शनासाठी पूर्व महाद्वाराच्या समोर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. देणगी दर्शनासाठी उत्तर महाद्वारातून व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज पाच हजार भाविकांना मंदिरात दर्शन घेता येईल.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

त्र्यंबकेश्वरचे अर्थकारण मंदिरांभोवती फिरते. त्र्यंबकेश्वर मंदिर अनेक दिवसांपासून बंद असल्याने शहरातील सर्व व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला. या मंदिरावर पूजा विधी, प्रसाद, हॉटेल, निवास, रिक्षा असे अनेक व्यवसाय अवलंबून आहेत.

मंदिर बंद असल्याने यापैकी काही जणांना आपला व्यवसाय बंद करून इतर व्यवसायाकडे वळावे लागले. रहिवाशांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. मंदिर सुरू होणार असल्याने सर्वानाच आनंद झाला आहे.

दर्शनासाठीचे नियम

* करोना संसर्ग लक्षात घेता सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, मुखपट्टीचा वापर करणे गरजेचे आहे.

* मंदिरात इतरत्र हात लावू नये.

* तीर्थ, विभूतीसाठी भाविकांनी आग्रह धरू नये.

* दर्शनासाठी येताना पादत्राणे वाहनातच ठेवावी.

हे वाचले का?  नाशिक : नाल्यामुळे हर्षवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

* मंदिर तसेच मंदिराच्या आवारात थुंकल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

* त्र्यंबकेश्वर शहरातील गावकऱ्यांसाठी दर्शनाची वेळ सकाळी आठ ते १० आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसात असेल.

ग्रामस्थांनी दर्शनासाठी येताना सोबत आधारकार्ड आणावे.