थंड नाशिकची टळटळीत उन्हाळय़ाकडे वाटचाल

उकाडय़ापासून बचाव करण्यासाठी नागरिक पंखे, वातानुकूलित यंत्र, कुलरचा आधार घेत आहे

नाशिक : अवकाळी पावसाने उघडीप घेतल्यानंतर जिल्ह्याची वाटचाल आता टळटळीत उन्हाळय़ाकडे सुरू झाली आहे. दोन दिवसांत काहिली प्रचंड वाढली असून तापमान ३८ अंशांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. रणरणत्या उन्हाने दुपारी रस्ते, बाजारपेठेतील वर्दळ कमी होऊ लागली आहे.

थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा पारा मार्चच्या मध्यावर चांगलाच उंचावला आहे. फेब्रुवारीअखेरीस त्याची सुरुवात झाली होती.

या वाटचालीत मध्यंतरी ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाने अडथळे आले होते. पावसाने उघडीप घेतल्यानंतर तापमान पुन्हा वाढत आहे. मंगळवारी ३७.१ अंशांची नोंद झाली. सकाळी १० वाजेपासून उन्हाचा तडाखा जाणवतो. दुपारी त्यात भर पडत असल्याने टळटळीत उन्हात घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. या काळात रस्ते आणि बाजारपेठेतील गर्दी कमी होत असल्याचे दिसून येते. या वर्षी तुलनेत लवकर तापमानाने उच्चांक

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

गाठल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर व ग्रामीण भागातील वेगळी स्थिती नाही. शेत शिवारातही शुकशुकाट दिसून येतो. 

उकाडय़ापासून बचाव करण्यासाठी नागरिक पंखे, वातानुकूलित यंत्र, कुलरचा आधार घेत आहे. एरवी पावसाळय़ात बाहेर निघणाऱ्या छत्र्या आता उन्हाळय़ातही बाहेर निघू लागल्या आहेत. शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. ठिकठिकाणी उसाचा रस, कुल्फी, ताक आदी खरेदीकडे कल वाढला आहे. उसाच्या रसाला मोठी मागणी आहे. करोनाकाळात या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. आता करोनाचा प्रभाव राहिला नसल्याने आणि निर्बंध शिथिल झाल्याने रसवंतीगृहावर गर्दी दिसून येते. वाढत्या तापमानात उष्माघात, शरीरातील पाणी कमी होणे, भोवळ येणे वा तत्सम विकारांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.