दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. जळपास दोन वर्षांनंतर दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, यंदाच्या दहीहंडीला गालबोट लागले आहे. थरावर थर रचण्याच्या नादात मुंबईत आत्तापर्यंत ७८ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमी गोविंदांवर मुंबईतील विविध रुग्णालायांमध्ये उपचार सुरु आहेत.
खबरदारी घेण्याचे प्रशासनाच्या सूचना
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांकडून थरावर थर रचले जातात. या थऱावरुन कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना कायमचे अपंगत्व येते तर काहींना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे प्रशासनातर्फे या गोविंदांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गोविंदांसाठी राज्य शासनाकडून १० लाखांचा विमा
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना राज्यशासनाकडून १० लाख रुपयांचा विमा कवच देण्यात आले आहे. जन्माष्टमीनिमित्त राज्यात आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव जितका लोकप्रिय आहे तितकीच त्यात जोखीम देखील आहे. दहीहंडीवेळी थरावरुन पडल्याने अनेक गोविंदांनी आजवर आपला जीव गमावला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. या उत्सवात जखमी झालेल्या गोविंदाकडे अनेकदा कानाडोळा करण्यात येतो. या अपघातामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटून जाते. या बाबी लक्षात घेता राज्यशासनाकडून ही योजना राबवण्यात आली आहे.
“प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीनिमित्त “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून गोविंदाना शासकीय नोकरी देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
जखमी गोविंदांवर मोफत उपचार
दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.