“मुख्यमंत्र्यांकडे या अतीवृष्टीमागे परदेशी हात असल्याची माहिती असेल तर ती माहिती त्यांनी गुप्तचर यंत्रणा, रॉ किंवा केंद्र सरकारला द्यावी,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिलीय.
तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी एक विचित्र दावा केला. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे परदेशी हात असून ढगफुटी हा एक कट असल्याचं चंद्रशेखर राव यांनी म्हटलंय. भद्रचलम येथील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना चंद्रशेखर राव यांनी हे विधान केलं आहे.
तेलंगण राष्ट्र समतिचे प्रमुख नेते असणाऱ्या चंद्रशेखर राव यांनी आपल्याकडे यासंदर्भातील थोडीफार माहिती असल्याचा दावा केलाय. देशातील काही भागांमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनांमागे परदेशी हात असल्याची माहिती माझ्याकडे आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यातील गोदावर नदीच्या पर्जन्यकक्षेत झालेल्या ढगफुटीही याच कटाचा भाग असल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलीय.
“ढगफुटी हा नवीन प्रकार समोर येऊ लागलाय. हे किती खरं आहे मला ठाऊक नाही. आपल्या देशाशी शत्रुत्व असणारे काहीजण देशात वेगवगेळ्या ठिकाणी ढगफुटी घडवून आणत आहेत,” असं चंद्रशेखर राव म्हणालेत. “यापूर्वी त्यांनी काश्मीर, लेह-लडाख, त्यानंतर उत्तरखंडमध्ये हे घडवून आणलं आणि आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ते गोदावरीच्या परिसरामध्ये हे घडवून आणत आहेत,” असं मुख्यमंत्री बैठकीमध्ये म्हणाले. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या भागाची हवाई पहाणी सुद्धा केली होती.
“हे जे काही असेल ते वातावरणातील बदलांमुळे झालं आहे. अशा परिस्थितीत आपण लोकांचे जीव वाचवणं फार महत्वाचं आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी भद्रचलम येथील पूरग्रस्त भागाची रविवारी पहाणी केली. त्यांनी या भागाला एक हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला. या पूराचा फटका बसलेल्या प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपये आर्थिक मदत आणि २० किलो मोफत तांदूळ देण्याची घोषणा चंद्रशेखर राव यांनी केली.
चंद्रशेखर राव यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि बंडी संजय कुमार यांनी प्रतिक्रिया देताना हा शतकातील सर्वात मोठा विनोद असल्याचं म्हटलंय, असं पीटीआयच्या वृत्तात नमूद केलं आहे. “स्वत:चं अपयश लपवण्यासाठी केसीआर नाटक करत आहेत. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन लोकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी मुख्यमंत्री परदेशी हात असल्याचं सांगत आहेत,” असं कुमार यांनी म्हटलंय.
काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष रवनाथ रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावताना मुख्यमंत्र्यांकडे या अतीवृष्टीमागे परदेशी हात असल्याची माहिती असेल तर ती माहिती त्यांनी गुप्तचर यंत्रणा, रॉ किंवा केंद्र सरकारला द्यावी, अशी मागणी केलीय.