देहू, आळंदीत वैष्णवांचा मेळा! तुकोबांच्या पालखीचे आज, माउलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराममहाराजांची पालखी आज शनिवारी (१० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी उद्या रविवारी (११ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

पिंपरी : आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराममहाराजांची पालखी आज शनिवारी (१० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी उद्या रविवारी (११ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. भाविक मोठ्या संख्येने देहूत दाखल झाले आहेत. देवस्थानकडून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३८ वे वर्ष आहे.

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाल्या आहेत. आळंदी-देहूच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर खांद्यावर भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी आणि डोईवर वृंदावन घेऊन निघालेल्या महिला दिसून येत आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये प्रत्येकाच्या मुखातून हरिभक्तीचे सूर निघत आहेत. आळंदी आणि देहू परिसरात आणि पंचक्रोशीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या राहुट्या दिसून येत आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत असलेल्या वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

तुकोबांच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदारवाड्यात आहे. उद्या माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम आळंदीतील गांधीवाड्यात असणार आहे. उद्या तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी पोहोचणार आहे.

तुकोबांच्या पालखीचे दुपारी प्रस्थान

जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात पहाटेपासूनच सुरू आहे. पहाटे पाचपासून शिळा मंदिर विठ्ठल-रखुमाई महापूजा, तपोनिधी नारायणमहाराज समाधी महापूजा, पादुका महापूजा आणि इतर विधी होतील. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत काल्याचे कीर्तन आणि इनामदारवाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. दुपारी दोनच्या सुमारास पालखीचे प्रस्थान होणार आहे. सायंकाळी पाचला पालखी मंदिर प्रदक्षिणा होणार असून, पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी असणार आहे.

हे वाचले का?  पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गुप्त भुयार? पुरातत्त्व खात्याकडून होणार पडताळणी..