धक्कादायक! राज्यात ११ लाख ग्राहकांकडे नादुरुस्त वीज मीटर

मुंबईचा काही भाग वगळून राज्याच्या बहुतांश भागात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या १० लाख ९७ हजार ग्राहकांकडे नादुरुस्त वीज मीटर लागले आहे.

नागपूर : मुंबईचा काही भाग वगळून राज्याच्या बहुतांश भागात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या १० लाख ९७ हजार ग्राहकांकडे नादुरुस्त वीज मीटर लागले आहे. १० ऑगस्ट २०२३ रोजीच्या महावितरणच्या अहवालातील ही स्थिती आहे. त्यामुळे ग्राहकांना अचूक देयक मिळणार कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

महावितरणच्या अहवालानुसार राज्यातील नादुरुस्त असलेल्या १० लाख ९७ हजार ४५६ मीटरपैकी सर्वाधिक ३ लाख ६४ हजार ११२ नादुरुस्त मीटर हे महावितरणच्या कोकण विभागात ग्राहकांकडे लागले आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख ५ हजार ७४२ मीटर, नागपूर विभागात २ लाख ६६ हजार ८६१ मीटर, पुणे विभागामध्ये १ लाख ६० हजार ७१३ नादुरुस्त मीटर ग्राहकांकडे लागले आहे. महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा असल्याने हे मीटर बदलून दिले जात नाही. त्यामुळे चुकीच्या रीडिंगनुसारच ग्राहकांना देयक भरावे लागत आहे. वीज मीटरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना खुल्या बाजारातून दुप्पट पैसे मोजून मीटर खरेदी करावे लागत आहे. नागरिकांची अशाप्रकारे लूट होण्याचे चित्र अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

३ टक्क्यांहून अधिक ग्राहकांकडे नादुरुस्त मीटर

महावितरणच्या ग्राहकांची संख्या सुमारे ३ कोटींच्या जवळपास आहे. त्यापैकी नादुरुस्त मीटरची संख्या बघता ३ टक्क्यांहून जास्त ग्राहकांकडे नादुरुस्त मीटर असल्याचे चित्र आहे. कंपनीला नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी दरमहा सुमारे दोन लाख मीटरची गरज भासते. याशिवाय नव्या जोडणीसाठीही नवीन मीटर लागतात. त्या तुलनेत महावितरणकडून सुरू असलेल्या मीटरचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे नादुरुस्त मीटर बदलण्याच्या ऐवजी नवीन जोडणीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

नादुरुस्त मीटरची संख्या आताच सांगणे शक्य नाही. परंतु, उपमुख्यमंत्री व महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नादुरुस्त मीटरचा विषय गांभीर्याने घेतला आहे. हे मीटर शक्य तेवढ्या लवकर बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. – भरत पवार, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.