धुळे जिल्ह्यात तोतया जीएसटी अधिकाऱ्यांचा धुमाकूळ, दोन मोटार चालकांना गंडा

व्यवहार मान्य करून पाठक यांनी फोन पेद्वारे संबंधित जीएसटी अधिकाऱ्याच्या मोबाईल नंबरवर ही रक्कम पाठविली.

धुळे: जिल्ह्यात तोतया जीएसटी अधिकाऱ्यांचा धुमाकूळ सुरुच असून पुन्हा एकदा लाल दिव्याचे वाहन वापरून तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी आणखी दोन मालमोटर चालकांना अनुक्रमे ४९ हजार ५०० आणि २१ हजार रुपयांना गंडा घातला. यासाठी कागदपत्रातील देयकांमध्ये चूक दर्शविण्यात आली. याप्रकरणी आझादनगर आणि सोनगीर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महामार्गांवर सर्रास लाल दिव्याचे वाहन वापरून भरदिवसा गुन्हेगार फिरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यासंदर्भात शेखर पाठक (३७, रा.दिल्ली) यांनी तक्रार दिली. पाठक हे एस आय एनर्जी व्हेन्चुअर्स प्रा.लि. नोएडा, दिल्ली या कंपनीत व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

या कंपनीला चार एप्रिल २०२३ रोजी श्रभजी प्रोसेस इंजि.वर्क लि. मुंबई यांनी काम दिले होते. मागणीप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे एसएसके लि. गौतम नगर, कोळपेवाडी, कोपरगाव, अहमदनगर येथे माल पोहच करण्यासाठी त्यांनी जीएसटी देयक तयार केले होते. यानंतर २२ सप्टेंबर २०२३ रोजी नोएडा, दिल्ली येथील कनेट पॅक लॉजिस्टीक या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालमोटारीद्वारे संबंधित ठिकाणी माल रवाना करण्यात आला.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

दरम्यानच्या प्रवासात २६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजता धुळे शहरातील पारोळा रोड उड्डाणपुलाजवळ लाल दिव्याच्या वाहनात असलेल्या तीन ते चार व्यक्तींनी जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करुन मालमोटर अडविली. चालकाला थांबवून तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी कागदपत्रे मागविली. यावेळी देयकात चुका असल्याचे सांगून त्यांनी चालकाकडून दंडाची मागणी केली. जीएसटी अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरु असल्याची माहिती चालकाने आपल्या मोबाईलवरुन शेखर पाठक यांना कळवली. यावेळी जीएसटी अधिकारी असलेल्या व्यक्तीने पाठक यांच्याशी त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर फोन करुन देयकात चुका असल्याचे सांगत दोन लाख ५० हजार रुपये दंडाची मागणी केली. पाठक यांनी देयकात कुठलीही चूक नाही, असे त्या अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपणांस दंड भरावाच लागेल, अन्यथा दिल्ली येथे येवून आपली मालमोटर न्यावी, असे सांगत तोतया जीएसटी अधिकाऱ्याने फोन बंद केला. त्यानंतर संबंधिताने पुन्हा पाठक यांच्याशी संपर्क साधला. ४९ हजार ५०० रुपये तत्काळ द्या, आम्ही मालमोटर सोडतो, असे सांगितले.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

हा व्यवहार मान्य करून पाठक यांनी फोन पेद्वारे संबंधित जीएसटी अधिकाऱ्याच्या मोबाईल नंबरवर ही रक्कम पाठविली. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे पाठक यांच्या लक्षात आले. त्यांनी २१ मे रोजी तोतया चारही जीएसटी अधिकाऱ्यांविरुद्ध आझाद नगर पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अखेर चौघा तोतया जीएसटी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दुसरी घटना २८ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरच देवभाने (ता. धुळे) शिवारातील वीर तेजा हॉटेल समोर घडली. लाल दिव्याच्या टाटा सुमो वाहनातून आलेल्या चौघांनी संजय यादव या मालमोटर चालकाला थाबविले. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली आणि देयकात त्रुटी दाखवून एक लाखाचा दंड भरण्यास सांगितले. तडजोडीअंती २१ हजार रुपये गुगल पेद्वारे स्वीकारण्यात आले. या प्रक्रियेत आपण फसविले गेलो, असे समजल्याने यादव यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचले का?  ६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी