महानगरपालिका आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या वतीने शुक्रवारपासून ‘नदी वाचवा’ अभियान सुरू करण्यात आले असून पहिल्या दिवशी नंदिनी नदीतून कचरा संकलित करून घंटागाडीद्वारे घनकचरा प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आला.
नाशिक : महानगरपालिका आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या वतीने शुक्रवारपासून ‘नदी वाचवा’ अभियान सुरू करण्यात आले असून पहिल्या दिवशी नंदिनी नदीतून कचरा संकलित करून घंटागाडीद्वारे घनकचरा प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आला.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नदी वाचवा अभियानांतर्गत कार्यक्रम झाला. आयुक्त रमेश पवार तसेच राष्ट्रीय छात्र सेना सात महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग अधिकारी अलोककुमार सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या अभियानात शहरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच मलेरिया विभागाचे २० कर्मचारी आदींनी श्रमदान करून नंदिनी नदी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला. याप्रसंगी आयुक्त पवार यांनी ‘नदी वाचवा? अभियान हे फक्त स्वच्छता अभियानाचा एक उपक्रम न राहता त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे असल्याचे सांगितले. शहरातील गोदावरी, कपिला, नंदिनी यांसारख्या नद्या स्वच्छ केल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे सांगितले. कर्नल अलोककुमार सिंग यांनी हे अभियान पृथ्वीला वाचविण्यासाठी महत्त्वाचे असून त्यासाठी सर्वानी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वच्छता जागृतीपर संदेश सादर करण्यात आले. त्यामध्ये ईश्वरी सूर्यवंशी, गोकुळ चव्हाण यांनी आणि सायक्लोथॉन डान्स ॲकॅडमीच्या कलाकारांनी स्वच्छता जनजागृतीपर सादरीकरण केले. विद्या सांगळे यांनी कथक केले. विद्यार्थी तसेच स्वच्छतादूत चंदू पाटील, पूर्व विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. २५ एप्रिल रोजी सातपूर, २६ रोजी उंटवाडी, २५ ते २७ असे तीन दिवस मुंबई नाका या ठिकाणी नंदिनी नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे
कमळ बाग खुली
कमळ ही दलदल तसेच उथळ पाण्यातील फुलवनस्पती आहे. गुलाबी, पांढरा या रंगांत कमळ फुलते. कमळाचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात येत चालले आहे. निसर्गाचा हा एक जैवविविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो अबाधित राहावा, कमळासह इतर जलवनस्पतींची नैसर्गिक पद्धतीने जपणूक व्हावी, लोकांमध्ये त्याविषयी प्रबोधन व्हावे, या दृष्टीने आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने दिंडोरी रोडवरील म्हसरुळ येथे कमळबाग फुलविण्यात आली आहे. या ठिकाणी ५० हून अधिक कमळ फुले आहेत. या बागेचे उद्घाटन वन अधिकारी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.