‘नव्या शैक्षणिक धोरणाला काँग्रेसचा विरोध’; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांचे छात्रभारतीला आश्वासन

संसदेत नव्या शैक्षणिक धोरणाला काँग्रेसच्या सोबतीने विरोध दर्शविला जाईल, राहुल गांधींचे आश्वासन

भारत जोडो यात्रेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे नाशिकमधून छात्रभारतीचे राज्य कार्यवाह समाधान बागूल, कार्यवाह अनिकेत घुले यांच्यासह १८ कार्यकर्ते सहभागी झाले. शाळाबंदी निर्णय मागे घ्यावा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे, शिक्षणावर अर्थसंकल्पाच्या १० टक्के खर्च करावा आदी फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. हे फलक पाहून राहुल गांधी यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले. स्मिता कसबे, स्वाती त्रिभूवन, प्रशिक सोनवणे या तीन कार्यकर्त्यांशी चालता चालता संवाद साधला.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

यावेळी नवे शैक्षणिक धोरण घातक असल्याचा मुद्दा मांडला गेला. शिक्षणाचे खासगीकरण होत आहे. बहुजन विद्यार्थ्यांच्या हातातून ते हिसकावून घेतले जात आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंदीला छात्रभारतीचा विरोध असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. हा विषय समजावून घेत खासदार गांधी यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचा विषय लोकसभेत मांडण्याचे आश्वासन दिले. छात्रभारतीने या मुद्यांवर आपले काम प्रभावीपणे सुरू ठेवावे. संसदेत नव्या शैक्षणिक धोरणाला काँग्रेसच्या सोबतीने विरोध दर्शविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे छात्रभारतीचे कार्यवाह समाधान बागूल यांनी म्हटले आहे. पदयात्रेत संघटनेचे देविदास हजारे, तुषार पानसरे, तृप्ती जोर्वेकर, राहुल जऱ्हाड, श्वेता शेटे, माधुरी घुले आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.