नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यास पाणवेलींचा विळखा

जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात थंडीमुळे देशी, विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला असताना अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात प्रदुषण, पाणवेलीचा विळखा, टायफा वनस्पती यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरात अडचणी येत आहेत.

अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात प्रदूषण, टायफा वनस्पतीमुळे पक्षी स्थलांतरात अडचणी

नाशिक : जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात थंडीमुळे देशी, विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला असताना अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात प्रदुषण, पाणवेलीचा विळखा, टायफा वनस्पती यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरात अडचणी येत आहेत. गोदा-कादवा यांच्या संगमावर १९०७-११ या कालावधीत ब्रिटिश शासनाने नांदुरमध्यमेश्वर धरण बांधले. या धरणात ४० वर्षांत गाळ साचत गेल्यामुळे पाणपक्ष्यांना मोठय़ा प्रमाणात खाद्य मिळू लागले. या अभयारण्यात २६० पेक्षा जास्त  जातीच्या पक्ष्यांची नोंद झाली असून  १९८२ मध्ये वल्र्ड वाइल्ड फंड ऑफ़ नेचर या पर्यावरणावर काम करणाऱ्या जागतिक संस्थेने या ठिकाणी प्रथम पक्षीगणना केली होती. त्या वेळी फ्लेिमगो दिसल्याची नोंद आहे. म्हणजे तब्बल २५ ते ३० वर्षांपासून या परिसरात फ्लेिमगोचे वास्तव्य आहे

हे वाचले का?  Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे यांच्या फेरीचा शांततेत समारोप

फ्लेिमगो हा पक्षी गुजरात पश्चिम सीमा, कच्छ या भागांतून नाशिककडे स्थलांतर करतो. या महिन्यातील तिथली थंडी त्यांना मानवत नाही. त्यामुळे ते नांदुरमध्यमेश्वरकडे स्थलांतर करतात. यंदाही ३० हजारांहून देशी-विदेशी पक्ष्यांनी अभयारण्य गजबजले आहे. यामुळे जणू काही पक्षी संमेलन भरल्याचे चित्र आहे. अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात प्रदुषित पाणी येत असल्याने या भागात पानवेली, टायफा वनस्पतींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळविताना अडचणी येत आहेत. पानवेली आणि  टायफाच्या मोठय़ा प्रमाणातील वाढीमुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागाच राहिली नसून अनेक पक्ष्यांनी या परिसरातून स्थलांतर केले आहे. मागील वर्षी वनअधिकाऱ्यांनी स्वत: पाण्यात उतरून पानवेली काढल्या होत्या. या समस्येविषयी नवीन आलेले अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे पक्षीमित्रांचे लक्ष आहे. या भागात मोठय़ा प्रमाणावर मासेमारीला सुरुवात झाली आहे. मानवी हस्तक्षेप वाढला असल्याने पक्ष्यांच्या अधिवासाला अडचणी येत आहेत.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

अभयारण्यातील निसर्ग मार्ग अगदी खराब झाला असून काही महिला पर्यटक पडल्याही होत्या. निसर्ग झोपडीची अवस्थाही बिकट आहे. जलपर्णीमुळे पक्ष्यांचे खाद्य असलेले शेवाळ नष्ट होत आहे. अभयारण्याजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रही जलपर्णीने व्यापले आहे. अशा वेगवेगळय़ा अडचणींना पक्षी तोंड देत आहेत. याचा परिणाम स्थलांतरावर होत आहे. अभयारण्यात सध्या कॉमन क्रेन, स्पूनबिल, उघडय़ा चोचीचा करकोचा, गुलाबी मैना, रंगीत करकोचा, युरेशिअन विजन, गडवाल, थापटय़ा, रोहित, जांभळी पाणकोंबडी, वारकरी, हळदी कुंकू, राखी धनेश, रंगीत करकोचा, पानकाडी बगळा, सुरय, कमळ हे पक्षी दिसत आहेत.

महिनाअखेरपासून कामाला सुरुवात

अभयारण्यात पाणवेली वाहात आल्या आहेत. धरणातून पाणी सोडले की या वेली या भागात वाहात येतात. यामुळे हा परिसर जलपर्णीने व्यापला आहे. सध्या पर्यटक या भागात येत आहेत. अशा स्थितीत पाणवेली काढता येणार नाहीत. तसेच पक्ष्यांच्या अधिवासालाही अडचण येऊ शकते. यामुळे हे काम थांबले आहे.  अभयारण्यातील गर्दी कमी झाली की या कामाला सुरुवात होईल. पाणवेली काढण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा झाली असून या महिन्याअखेर या कामाला सुरुवात होईल अशी माहिती नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याचे वनपाल एस. एस. देवकर यांनी दिली.

हे वाचले का?  मतदार याद्यांवरून मविआ – महायुतीत रणकंदन;मालेगावातील नावे नाशिक मध्य मतदारसंघात नोंदविल्याची भाजपची तक्रार