नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षी महोत्सव वादात

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पाच आणि सहा मार्च रोजी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

वन विभाग-पर्यटन संचालनालयात विसंवाद

नाशिक: महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पाच आणि सहा मार्च रोजी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, महोत्सव सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महोत्सवात प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाल्यास त्याचे नियोजन कसे करणार, यावरून वनविभाग आणि पर्यटन संचालनालयात विसंवाद निर्माण झाला आहे

 नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य संवेदनशील समजला जातो. अशा भागात पर्यटन संचालनालयाकडून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभयारण्यास रामसरचा दर्जा मिळालेला असतानाही अनेक समस्या कायम आहेत. धरण परिसरातील पाणथळ भागात पाणवेलीसह टायफो वनस्पती मोठय़ा प्रमाणावर आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी मुबलक स्वरूपात नाही, स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. याशिवाय एखादा पक्षी जखमी झालाच तर त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी उपचार केंद्र नाही. महोत्सवातंर्गत मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह बचत गटांचे दालन, व्याख्याने, काही स्पर्धा होणार आहेत.

हे वाचले का?  इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता

मुळात संवेदनशील असलेल्या परिसरात हा महोत्सव घेण्यावर पक्षी मित्रांनी आक्षेप घेतला आहे. या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था नाही. अभयारण्यात सध्या ३० हजारांहून अधिक पक्षी असतांना त्यांना पाहण्यासाठी दुर्बिणची व्यवस्था नाही. मनोऱ्याची अवस्था फारशी चांगली नाही. अभयारण्यातील रस्ते खराब आहेत.  या ठिकाणी ध्वनिक्षेपकांवरून मोठय़ा आवाजात गाणी वाजविल्यास पक्ष्यांसाठी ते धोकादायक ठरु शकते. या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर आहे. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात कोणालाही विश्वात घेण्यात आले नसल्याची अनेकांची तक्रार आहे.

गांभीर्य नाही

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

पक्षी महोत्सव संकल्पना चांगली असली तरी याविषयी वनविभाग तसेच पर्यटन विभागाला याचे गांभीर्य नाही. महोत्सव भरवताना अभयारण्यातील वेगवेगळय़ा अडचणी सोडवणे गरजेचे होते. करोना निर्बंधामुळे लोक कंटाळले असताना आता बाहेर पडत आहेत. पक्षी महोत्सवास मोठय़ा प्रमाणावर गर्दी होईल. मात्र या गर्दीवर नियंत्रण कसे आणणार, या ठिकाणी पक्ष्यांसोबत अन्य वन्यजीव आहेत. कार्यक्रमास येणाऱ्या पर्यटकांसाठी काही विशिष्ट मार्ग आहे का ? नागरिकांना पक्ष्यांची माहिती कोण देणार, पक्षी पाहण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री आहे का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. संवेदनशील  असलेल्या भागात महोत्सव भरवतांना ध्वनीक्षेपक वापरू नये, हा नियम असतांना हा नियम धाब्यावर बसवत या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नियोजनात वन विभाग आणि पर्यटन विभागाचा ताळमेळ नाही.

-प्रा. आनंद बोरा (पक्षी मित्र)

सर्व नियम सांभाळूनच महोत्सव

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात होणारा महोत्सव सर्व नियम सांभाळून होत आहे. परिसरात मंडप टाकण्यात आला असून तो अभयारण्यापासून दूर आहे. सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत. आवाजावरही नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. पक्ष्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.

– मधुमती सरदेसाई-राठोड (उपसंचालक, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय)