नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांसह पर्यटकांच्या संख्येतही वाढ

थंडीचा जोर वाढू लागताच नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाटही वाढला असून पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांचीही संख्या वाढली आहे.

नाशिक: थंडीचा जोर वाढू लागताच नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाटही वाढला असून पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांचीही संख्या वाढली आहे. निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य हे जैवविविधतेने नटलेले आहे. धरणाच्या पाण्यातील अडथळे, पाणथळ जागा या मुळे अभयारण्यात ठिकठिकाणी पक्ष्यांचा अधिवास आढळतो.

काही दिवसांपासून थंडीत वाढ होताच देश, विदेशातील पक्ष्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. वन विभागाच्या वतीने पक्षी गणना करण्यात आली असता मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हिवाळ्यात पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. अभयारण्य परिसरातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मध्येश्वरी गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरूडगाव, काथरगांव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्षी दिसत आहेत.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

कॉमन क्रेन, नॉर्दन शॉवलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन व्हिजन, गडवाल, रुडी शेल डक, मार्श हॅरियर, ब्लु थ्रोड, ब्लु चिक बी ईटर, उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, रिव्हीर टर्न यासह ५५ प्रकारच्या देशी, विदेशी पक्ष्यांचे दर्शन होत आहे. पक्ष्यांची मांदियाळी पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. त्यात विदेशातील पर्यटकांचाही समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांना पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता यावा, यासाठी दुर्बिण, मनोरे याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय निसर्गप्रेमींना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षी मार्गदर्शकही आहे. ज्येष्ठांना एकाच ठिकाणी थांबून पक्षी निरीक्षणाची व्यवस्था मात्र सध्या बंद आहे.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

अभयारण्यात पक्षी लपनगृह

अभयारण्य परिसरातील पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत आहेत. या पर्यटकांचा होणारा वावर पक्ष्यांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन अभयारण्यात पक्षी लपनगृह तयार करण्यात आले आहे. या लपनगृहात पर्यटक जातात. आणइ तेथूनच पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतात.

पर्यटकांनी आनंद घ्यावा

सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. अधिक प्रकारचे पक्षी अभयारण्यात आले आहेत. सकाळी अंधुक वातावरण राहत असल्याने वन विभागाने वेळ बदलली आहे. सकाळी साडेसातपासून अभयारण्य खुले होते. पर्यटकांनी याची नोंद घेत जास्तीजास्त वेळ अभयारण्यात घालवावा.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

– अमोल दराडे (पक्षी मार्गदर्शक, नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य)