नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज आहेत?; संजय राऊतांनी दिला दुजोरा

विधानसभा अध्यक्षपदाबद्दल पुन्हा चर्चा होणार…

काँग्रेसनं महाराष्ट्रात खांदेपालट करत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं नाना पटोले यांच्या हाती दिली आहेत. त्याचबरोबर सहा कार्य अध्यक्षही नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्यानं विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त झालं आहे. पुन्हा निवडणूक होणार असून, यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.

कांग्रेसनं विधानसभेचं अध्यक्षपद असलेल्या नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं. “नक्कीच ती भूमिका आहे. कारण अशा प्रकारच्या घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असं आम्ही सामनात म्हटलं आहे. पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असतं. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीनं राजीनामा दिल्यानं पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांचं बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

“काँग्रेसला संजीवनी देण्याचा त्यांचा उत्साह महत्त्वाचा आहे. सत्तेमध्ये नसला तरी काँग्रेस महत्त्वाचा. पक्षाची परंपरा इतिहास महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशात काँग्रेसला संजीवनी मिळावी. मजबूतीनं काँग्रेस उभी राहावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांनी पक्षातंर्गत परिवर्तन केलं असेल, तर तो त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. नाना आम्हाला प्रिय आहेत. नाना पटोले हे सक्षम आणि आक्रमक नेते आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला ऊर्जा देण्याचं काम नानांनी करावं. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हीही आमचा पक्ष वाढवू. पण, काँग्रेस देशात मजबूत व्हावी,” असं खासदार संजय राऊत म्हणाले.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

विधानसभा अध्यक्षपदाबद्दल पुन्हा चर्चा होणार…

विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबद्दल राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले,”शरद पवार यांनी ही गोष्ट म्हटली आहे. त्यामुळे यावर पुन्हा चर्चा होईल. जेव्हा काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद दिलं होतं, ते पाच वर्षांसाठी दिलेलं होतं. तेव्हा कुणाला माहिती नव्हतं की, विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक होईल. त्यामुळे आता पुन्हा निवडणूक का? याचाही काँग्रेसनं विचार करायला हवा होता. पण, ठीक आहे. काँग्रेसनं निर्णय घेतला आहे. तीन पक्ष बसून निर्णय घेतील.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?