नारायण राणे यांना विपश्यनेची गरज

नारायण राणे यांना विपश्यनेची गरज

संजय राऊत यांचा सल्ला

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रकृती बरी नसते. त्यांचे मन:स्वास्थ्य बिघडलेले आहे. अशा वेळी आधाराची गरज असते. त्यांनी विपश्यना करावी. राणे यांचे मन:स्वास्थ्य सुधारावे, यासाठी शिवसैनिक दररोज एक मिनिटाची प्रार्थना करणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपरोधिकपणे सांगितले. राणे यांच्या मुलांसह भाजपनेही त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सेना-भाजपमध्ये धुमश्चक्री उडाली होती. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती. या घटनाक्रमानंतर शनिवारी शहरात आलेल्या राऊत यांनी शिवसैनिकांनी ‘करेक्ट’ कार्यक्रम केल्याचे नमूद केले. भाजप राणेंच्या खांद्यावरून राजकारण करीत आहेत. जे राणे बोलतात ते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील किं वा आशीष शेलार बोलणार नाहीत. त्यांना आपली ही संस्कृती नसल्याचे ज्ञात आहे.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

त्यामुळे बाहेरच्यांना बोलावून चिखलफेक केली जाते; परंतु यामुळे महाविकास आघाडी सरकार मजबूत होत आहे, असे राऊत यांनी सांगितले.

‘पोलीस आयुक्तांशी  कौटुंबिक संबंध’

केंद्रीय मंत्री राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटकेचे आदेश काढणारे पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये यांची राऊत यांनी भेट घेतली. पाण्ड्ये यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच राणे यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला काय, हे मात्र राऊत यांनी नाकारले. मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्याविरुद्ध कुठेही गुन्हा दाखल होऊ शकतो. राज्यात कायद्याचे राज्य आहे.