महायुतीच्या जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसताना श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. विविध आघाड्या व युतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. काही ठिकाणी तर उमेदवारांची घोषणाही काही पक्षांकडून करण्यात आली आहे. मात्र, या नावांना मित्रपक्षांच्याच काही नेत्यांचा विरोध असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. नाशिकमध्ये तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या घोषणेला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे.
नेमकं काय घडतंय नाशिकमध्ये?
मंगळवारी नाशिकमध्ये शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेही उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात हेमंत गोडसे यांच्या कामाचं कौतुक करताना श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. “धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार आहे. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे. महाराष्ट्रात अब की बार ४५ पार करायचं आहे. त्यात हेमंत गोडसेही असतील”, असं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेंच्या नावाची केलेली घोषणा काही स्थानिक भाजपा नेत्यांना रुचली नसल्याचं दिसून येत आहे. भाजपाचे स्थानिक पदाधिकारी दिनकर पाटील यांनी श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला विरोध केला आहे. “जागावाटप होईल, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, त्यानंतर तो जाहीर होईल. तो निर्णय अंतिम असतो. त्यामुळे काल जे काही झालं, ते जनतेला मान्य नाही”, असं ते म्हणाले.
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिंदे गट व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली होती. त्यातच अद्याप कोणतंही जागावाटप अंतिम झालेलं नसताना श्रीकांत शिंदे यांनी थेट उमेदवाराचीच घोषणा केल्याामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
यावेळी श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “एकनाथ शिंदेंचं काम पाहून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. रोज उठून एकनाथ शिंदेंच्या नावानं ते शिव्या देत राहतात. गेल्या दोन वर्षांपासून एकच टेपरेकॉर्डर वाजते. गद्दार, खोके, खंजीर.. त्यापलीकडे दुसरं काहीच बोलत नाही. लोकांनी संधी दिली तेव्हा ते अडीच वर्षं घरीच बसले होते.