नाशिकजवळ पवन एक्स्प्रेस घसरली ; एका प्रवाशाचा मृत्यू, चारजण जखमी

एलटीटी- जयनगर पवन एक्स्प्रेस इगतपुरीकडून नाशिककडे येत असताना हा अपघात झाला.

नाशिक : मुंबईहून निघालेल्या पवन एक्स्प्रेसचे ११ डबे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास देवळाली-लहवीतदरम्यान घसरले. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले असले तरी रेल्वेने त्यास दुजोरा दिलेला नाही. अपघातात चार प्रवासी जखमी झाले. या अपघातामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 

एलटीटी- जयनगर पवन एक्स्प्रेस इगतपुरीकडून नाशिककडे येत असताना हा अपघात झाला. लहवीतजवळ रेल्वेमार्ग उखडून एकामागोमाग एक डबे घसरले. त्यांची चाके जमिनीत रुतली. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटलेली नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले. पुष्पो महंतो, मुकेश महंतो, सरोज मिश्रा आणि लखीमचंद हे प्रवासी जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.    

हे वाचले का?  इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता

अपघातग्रस्त गाडीत १२०० प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिकांनी प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन आणि मनपा शहर बससेवेच्या गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या. लगतची दुसरी मार्गिका (नाशिक-मुंबई) सुमारे ५०० मीटर अंतरावर असल्याने अपघातात ती बाधित झाली नाही. अपघातात रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झाले. इगतपुरी, मनमाड व भुसावळ स्थानकाहून रेल्वेचे आपत्कालीन साहाय्यता पथक, वैद्यकीय पथक, क्रेनसह अपघातस्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त रेल्वे रुळावर घेणे आणि रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी किमान आठ ते १० तास लागण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

प्रवाशांचे हालअनेक गाडय़ा रद्द

अपघातामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई- भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मुंबईहून निघालेल्या अनेक गाडय़ा वेगवेगळय़ा स्थानकांवर थांबविण्यात आल्या. मनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ठिकठिकाणी गाडय़ांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या काही गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले. रविवारी सायंकाळी मुंबई येथून सुटणारी मुंबई – मनमाड-पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. ही गाडी सोमवारी मनमाड येथून मुंबईकडे मार्गस्थ होते. तीही रद्द करण्यात आली. मुंबई -आदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड, नांदेड-मुंबई, एलटीटी-पुरी, पुरी-एलटीटी, मुंबई-अमरावती, अमरावती-मुंबई या गाडय़ा रद्द करण्यात आल्या. मुंबई- हजरतनिजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट एक्स्प्रेस दिवा, वसई मार्गे, मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस नंदुरबार-जळगावमार्गे वळविण्यात आली. जालना जनशताब्दी, जबलपूर गरीबरथ, वाराणसी आणि गोरखपूर एक्स्प्रेस या नियंत्रित केल्या जाणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा