नाशिकमध्ये युवक महोत्सवानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम

नाशिक शहरात जिल्हा परिषदेच्या वतीने सहा ते ११ जानेवारी या कालावधीत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक – शहरात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने सहा ते ११ जानेवारी या कालावधीत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले. शाळांमध्ये स्वच्छता शपथ, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली.

हे वाचले का?  चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्हा परिषदेच्या सात प्रमुख विभागांचा सहभाग असून दररोज विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. शाळांमध्ये स्वच्छता शपथ घेण्यात आली. आरोग्य विभागांतर्गत किशोरवयीन मुलींचे मेळावे घेऊन त्यांना वैयक्तिक स्वच्छता तसेच अन्य आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. अंगणवाडी केंद्रांचीही स्वच्छता करण्यात आली.