यंदाचा पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा गावातील प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम यांना जाहीर झाला आहे. २० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात पुरस्कार सोहळा होणार आहे.
नाशिक – येथील आनंदनिकेतन शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थापक अरुण ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वंचित घटकांसाठी, वेगळ्या वाटेने आणि प्रयोगशील पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा गावातील प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम यांना जाहीर झाला आहे. २० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात पुरस्कार सोहळा होणार आहे.
आनंदनिकेतन शैक्षणिक संस्थेच्या वतीने ठाकूर यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था-शिक्षकांना गौरविण्यात येते. पहिला पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनातील निर्वासितांसाठी चालणाऱ्या जीवनशाळेला देण्यात आला होता. दुसऱ्या पुरस्काराचे मानकरी सोलापूर जिल्ह्यातील शेजबाभूळ गावातील मुलांच्या मदतीने विज्ञानग्राम वसविणारे पैगंबर तांबोळी यांना देण्यात आला होता. यावर्षीचा पुरस्कार जाहीर झालेल्या वैशाली गेडाम या गावात गोंड मुलांना ज्ञानरचनावाद पद्धतीने शिक्षण देतात. मुलांना नैसर्गिक पद्धतीने, त्यांच्या कलाने आणि गतीने शिकण्यास प्रवृत्त करत शाश्वत मूल्यांपर्यंत घेऊन जाणे हा त्यांचा ध्यास आहे. मुलांना शिकायची आवड असतेच, त्यांना फक्त योग्य वातावरण निर्मिती निर्माण करून देण्याची गरज असते. ते दिल्यास शिकणे आणि शिकविणे ही आनंददायी प्रक्रिया होऊन जाते. या विधानाचा प्रत्यय गेडाम यांच्या शैलीत येतो. गेडाम अवघ्या २९ मुलांच्या शाळेत शिकवित आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यास ‘एमकेसीएल’चे मुख्य सल्लागार तथा माजी संचालक विवेक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सावंत यावेळी आधुनिक काळात शाळांची तसेच शिक्षकांची भूमिका काय असावी, या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. पालक आणि शिक्षणप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आनंदनिकेतनच्या वतीने करण्यात आले आहे.