नाशिक : आरोग्य विद्यापीठाचा शुक्रवारी दीक्षांत सोहळा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी येथील विद्यापीठ मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी येथील विद्यापीठ मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस आभासी पध्दतीने उपस्थित राहणार आहेत. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ तसेच बेळगावचे के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगणे हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  पंतप्रधानांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन, तपोवनातील मैदानावर जय्यत तयारी

कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी, दीक्षात सोहळा शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत सकाळी ११ वाजता होणार असल्याचे सांगितले. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी, दीक्षांत समारंभात डॉ. ख्रिस्टोफर डिसूजा यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डी.लिटने गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले. समारंभात विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे.

हे वाचले का?  मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई