नाशिक : आवर्तनाचे पाणी पोहचण्यासाठी काही गावांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश

एक ते २५ मार्च कालावधीत हे आवर्तन सुरु राहणार आहे.

आवर्तन म्हणून सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहचावे, पाणी चोरी होऊ नये यासाठी निफाडसह सिन्नर तालुक्यातील काही गावांची वीज जोडणी खंडित करावी, असा आदेश जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी दिला आहे. दारणा धरणातून गोदावरी उजव्या आणि डावा कालव्यावरील तसेच दारणा, गोदावरी नदीकाठावरील सिंचनासाठी आणि पाणी पुरवठा योजनांसाठी आवर्तन म्हणून पाणी सोडण्यात येणार आहे. एक ते २५ मार्च कालावधीत हे आवर्तन सुरु राहणार आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

या काळात शेतकऱ्यांकडून कालव्यात मोटारी टाकून पाणी चोरीची शक्यता लक्षात घेता कालवा परिसरातील गावांचा वीज पुरवठा हा आवर्तन कालावधीत सकाळी सहा ते आठ ही वेळ वगळता खंडित करण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामध्ये निफाड तालुक्यातील खानगाव, तारूखेडले, तामसवाडी, करंजी, सिन्नर तालुक्यातील चौंढी,, मेंढी, सांगवी, साेमठाणा, दहिवाडी, उजनी, शहा, कारवाडी, विधनवाडी, पुतळेवाडी, पाथरे, कोळगांव माळ आदी गावांचा समावेश आहे. पाणी शेवटच्या गावांपर्यंत पोहचावे ही जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहिल. दरम्यान, वीज बंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, सर्व अनधिकृत उपसा करणाऱ्यांचा विद्युत पुरवठा कायम स्वरूपी खंडित करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून पाणी चोरी करणाऱ्यांवर पाटबंधारे विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.