नाशिक : केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांद्याच्या माळा घालून मतदान

कांदा निर्यातीसंदर्भात केंद्राच्या धरसोड भूमिकेविरोधात शेतकऱ्यांचा रोष कायम असून चांदवड तालुक्यातील वडगाव येथे बहुसंख्य शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केले.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा हाच विषय प्रचाराच्या केंद्रस्थानी होता. कांदा निर्यातीसंदर्भात केंद्राच्या धरसोड भूमिकेविरोधात शेतकऱ्यांचा रोष कायम असून चांदवड तालुक्यातील वडगाव येथे बहुसंख्य शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केले.

वडगांव येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत मतदानासाठी जाताना गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या. केंद्राविरोधात त्यांच्याकडून घोषणाबाजीही करण्यात आली. कांद्यावर आमचे आयुष्य अवलंबून आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा दरावरुन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. त्यांनी आमचे हाल केले, अशी भूमिका मांडत त्यांनी मतदान केंद्र गाठले. पोलिसांनी त्यांना मतदान केंद्राबाहेर थांबवित कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. परंतु, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कांद्याच्या माळा गळ्यात ठेवूनच त्यांनी मतदान केले.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या बागलाण विधानसभा मतदार संघातही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी आमदार तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली. त्यांना मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडविल्यावर पती माजी आमदार संजय चव्हाण यांनी हस्तक्षेप करीत कांद्याच्या माळेसह दीपिका यांना मतदान केंद्र आवारात प्रवेश करण्यास मदत केली. परंतु, मतदान खोलीत प्रवेश करण्यापूर्वी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांना कांद्याची माळ काढण्यास भाग पाडले. माजी आमदार चव्हाण यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये कांदा भावाकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळ कामकाजात सहभागी होताना गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या.

हे वाचले का?  मतदार याद्यांवरून मविआ – महायुतीत रणकंदन;मालेगावातील नावे नाशिक मध्य मतदारसंघात नोंदविल्याची भाजपची तक्रार