नाशिक: गणेशोत्सवातील वीज दरावरून वाद; देयके न भरण्याचा मंडळांचा पवित्रा

गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने सरसकट वीज देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असताना महावितरणने मात्र वीज वापरानुसार वेगवेगळी दर आकारणी करीत भरमसाठ देयके पाठविल्याची तक्रार नाशिक गणेशोत्सव महामंडळाने केली आहे.

नाशिक: गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने सरसकट वीज देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असताना महावितरणने मात्र वीज वापरानुसार वेगवेगळी दर आकारणी करीत भरमसाठ देयके पाठविल्याची तक्रार नाशिक गणेशोत्सव महामंडळाने केली आहे. जादा दराची देयके कुठलेही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणार नसल्याचा पवित्रा संबंधितांनी घेतला आहे.

महावितरणने सार्वजनिक गणेश उत्सवासाठी मंडळांना सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज जोडणी दिली होती. ही जोडणी देण्याआधी वीज कंपनीने वीज वापरानुसार युनिटनिहाय दर देखील जाहीर केले होते. गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांनी मंडळांना किमान दराने वीज आकारणी करण्याचे म्हटले होते, याकडे महामंडळ लक्ष वेधत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन आणि प्रत्यक्षात हाती पडलेली देयके यात मोठी तफावत आहे. युनिटनिहाय वीज कंपनीने वेगवेगळ्या टप्प्यात दर आकारणी केली. परिणामी, ज्या मंडळाचे देयक तीन, चार हजार रुपये येणे अपेक्षित होते, त्यांना १५ ते १६ हजार रुपयांची देयके आल्याचे महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये यांनी सांगितले. लहान, मोठ्या मंडळांना सात ते दहा हजार रुपयांपर्यंत देयक आले आहेत. वीज वापरानुसार वाढीव दर आकारणी झाल्यामुळे अनेक मंडळांना चार ते पाच पट अधिक देयके आली. शहरात लहान-मोठी सुमारे १२०० सार्वजनिक मंडळे आहेत. तात्पुरती वीज जोडणी घेताना महावितरण मंडपाचा आकार पाहून अनामत रक्कम घेते. दरवर्षी ही अनामत रक्कम जितकी असते, तेवढे देयक येते. यंदा मात्र अनामत रकमेपेक्षा जास्त देयके येण्यामागे वाढीव दर आकारणी हे कारण असल्यावर शेट्ये यांच्यासह काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बोट ठेवले.

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

दर आकारणीमुळे उद्भवलेल्या तिढ्यावर महामंडळाने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संबंधितांनी विचार केला जात असल्याचे म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविले जाईल. वाढीव दराची देयके भरली जाणार नसल्याचे शेट्ये यांनी म्हटले आहे. या प्रश्नी तोडगा न निघाल्यास वीज नियामक आयोगाकडे दाद मागण्याची तयारी गणेशोत्सव महामंडळाने केली आहे.

गणेशोत्सवात जाहीर झालेले दर

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम

महावितरणने गणेशोत्सवात सवलतीच्या दराने मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी दिली होती. घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच ही वीज आकारणी केली जाणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यानुसार पहिल्या १०० युनिटसाठी चार रुपये ७१ पैसे प्रति युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी आठ रुपये ६९ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ५०० प्रती युनिट वीज वापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दर होते. वीज कंपनीने आधी जाहीर केलेल्या दरानुसार मंडळांना वीज देयके पाठविल्याचे सांगितले जाते.