नाशिक गारठले

रिमझिम अवकाळी सरीनंतर निरभ्र झालेले आकाश आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या वाढत्या वेगाने नाशिकमध्ये कडाक्याची थंडी अवतरली.

पारा ७.३ नीचांकी पातळीवर

नाशिक : रिमझिम अवकाळी सरीनंतर निरभ्र झालेले आकाश आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या वाढत्या वेगाने नाशिकमध्ये कडाक्याची थंडी अवतरली. गारठा इतका वाढला की, सर्वाना अक्षरश: हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. वातावरणातील अकस्मात बदलाने सोमवारी हंगामातील ७.३ अंश या नवीन नीचांकी तापमानाची नोंद झाली. पारा इतका खाली उतरला असला तरी मागील तीन ते चार वर्षांत तो ५.७ आणि सहा अंशापर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदा तो कोणती पातळी गाठतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

या हंगामात डिसेंबरच्या अखेरीस ८.२ अंशाची नोंद झाली होती. नवीन वर्षांत गारवा काहीसा कमी झाला होता. या काळात पारा १६.९ ते १४.५ अंशादरम्यान राहिला. त्यातच गेल्या शनिवारी काही भागात रिमझिम, मध्यम स्वरूपात पाऊस झाला. वातावरण बदलले. रविवारी  आकाश निरभ्र झाले. आद्र्रता वाढली नाही. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या शीत प्रवाहाचा नाशिकच्या तापमानावर प्रभाव पडतो. मागील काही दिवसांत सरासरी एक-दोन किलोमीटर ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी आठ किलोमीटरवर पोहोचला. याची परिणती नाशिक गारठण्यात झाल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. एकाच दिवसात तापमान जवळपास सात अंशाने खाली आल्याने थंडीची तीव्रता जाणवू लागली. बोचऱ्या वाऱ्याची त्यात भर पडली. या एकंदर स्थितीमुळे दिवसा घराबाहेर पडणारेच नव्हे तर, घरात असणाऱ्यांनाही उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागला. हिवाळय़ात सकाळी व्यायाम आणि भ्रमंतीला घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही सोमवारी कडाक्याच्या गारठय़ाने कमी झाली.

हे वाचले का?  मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान

शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा कडाका अधिक आहे. पारा घसरत असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती आहे. अवकाळीत आधीच बागांचे मोठे नुकसान झाले होते. तापमान असेच खाली गेले तर बागांवर रोगराईचे प्रश्न उभे राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

थंडीच्या लाटेकडे..

तापमानाची ही पातळी सलग काही दिवस कायम राहिल्यास थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे. त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे गारवा वाढू शकतो. त्यामुळे थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. मागील तीन, चार हंगामात पारा ५.७ ते सहा अंशापर्यंत घसरल्याचे दिसून येते. २८ डिसेंबर २०१८ रोजी ५.७, १७ जानेवारी २०२० मध्ये सहा अंश, नऊ जानेवारी २०२१ मध्ये ९.१ अंश अशा नोंदी झाल्या आहेत. मागील काही वर्षांत जानेवारीत नीचांकी तापमान नोंदले गेले. त्यामुळे या हंगामात नवीन नीचांक नोंदला जाण्याविषयी उत्सुकता आहे.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा