नाशिक : चोरांकडून आठ भ्रमणध्वनी, पाच बॅगा जप्त , इगतपुरी रेल्वे पोलिसांची कामगिरी

तपास पथकाने तीन संशयितांना विविध गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडून चार भ्रमणध्वनी, लॅपटॉप आणि पाच बॅगा जप्त केल्या.

इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये घडलेल्या भ्रमणध्वनी आणि बॅग चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात इगतपुरी रेल्वे पोलिसांना यश आले असून तीन संशयितांकडून चार भ्रमणध्वनी, लॅपटॉप आणि पाच बॅगा जप्त केल्या आहेत. लोहमार्ग औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, गणेश शिंदे यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक सचिन बनकर, लोहमार्ग औरंगाबाद सायबर विभागाच्या प्रभारी सहायक निरीक्षक प्रेमलता जगताप यांना मागर्दशन करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकामार्फत तपास करुन मुंबई, नाशिक, मालेगाव येथून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

तपास पथकाने तीन संशयितांना विविध गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडून चार भ्रमणध्वनी, लॅपटॉप आणि पाच बॅगा जप्त केल्या. पथकाने इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याकडील नऊ गुन्हे उघडकीस आणून एक लाख, ४० हजार १८९ रुपयांचा मुद्धेमाल हस्तगत केला. इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक सचिन बनकर, लोहमार्ग औरंगाबाद सायबर विभागाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप, पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार आणि सायबर विभागातील वैभव पाटील, दिनेश चामनार यांनी केली.