नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टच्या अखेरीस धरणसाठा १० टीएमसीने उंचावून तब्बल ५३ हजार २५१ दशलक्ष घनफूट म्हणजे ५३.२५ टीएमसीवर पोहोचला आहे.

नाशिक – सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टच्या अखेरीस धरणसाठा १० टीएमसीने उंचावून तब्बल ५३ हजार २५१ दशलक्ष घनफूट म्हणजे ५३.२५ टीएमसीवर पोहोचला आहे. गतवर्षी याच काळात जलसाठा ४३ हजार ५७७ दशलक्ष घनफूट म्हणजे ४३.५७ टीएमसी होता. मुसळधार पावसामुळे सोमवारीदेखील २० धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. लहान-मोठी सर्वच धरणे ओसंडून वहात असताना नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या हे एकमेव धरण आजही कोरडेठाक आहे.

जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम धरणातील जलसाठा बुधवारी ८१.१० टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील दुष्काळी वर्षात हे प्रमाण ६६.३६ टक्के इतके होते. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह या समुहातील सर्वच धरणे तुडुंब झाली आहेत. धरण परिचालन सूचीनुसार ऑगस्ट्च्या अखेरीस १०० टक्के जलसाठा करता येत नाही. त्यामुळे गंगापूर धरण ९० टक्के, काश्यपी ८२, गौतमी गोदावरी (९४.८६), आळंदी (१००) टक्के असा जलसाठा आहे. गंगापूर आणि गौतमी गोदावरीतून अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. दिंडोरी तालुक्यातील पावसामुळे पालखेड धरण समुहातील धरणे तुडुंब भरण्याच्या स्थितीत आहेत. पालखेड धरणात ७७ टक्के जलसाठ्याची पातळी राखून समारे १८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या समुहातील करंजवण (९७) , वाघाड (१००) टक्के जलसाठा आहे. ओझरखेड (१००), पुणेगाव (८६), तिसगाव (१००), दारणा (९३), भावली (१००), कडवा (८६), नांदूरमध्यमेश्वर बंधारा (८१), भोजापूर (१००), चणकापूर (८७), हरणबारी (१००), केळझर (१००), गिरणा (६४.९८), पुनद (७५.११), माणिकपुंज (९०) टक्के असा जलसाठा झाला आहे.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

ऑगस्ट अखेरपर्यंत बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. पुराचे अधिकतम किती पाणी जायकवाडीसाठी वाहून जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

२० धरणांमधून विसर्ग

तुडुंब झालेल्या वा होण्याच्या स्थितीत असणाऱ्या जिल्ह्यातील २० धरणांमधून विसर्ग करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूरचा विसर्ग सायंकाळी ९४५० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास त्यात टप्याटप्प्याने वाढ केली जाईल, असे पाटबंधारे विभागाने सूचित केले आहे. दारणा धरणातून १०१२०, भावली ७०१, भाम २१७०, गौतमी गोदावरी ४६०८, वालदेवी १८३, वाकी ९४५, कडवा ४९४६, आळंदी २४३, नांदूरमध्यमेश्वर ६९ हजार ३६७, भोजापूर १५२४, पालखेड १७७३१, करंजवण ६४८०, वाघाड ३८३६, तिसगाव ४८१, पुनेगाव ३०००, ओझरखेड ३१७०, चणकापूर १६२६८, हरणबारी ७६४३ आणि केळझरमधून २७१६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा