नाशिक: जिल्ह्यात ६३ टक्के पाऊस, सहा तालुक्यात प्रमाण कमी

मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेला असला तरी आणि काळ्या ढगांनी आकाश व्यापण्यात येत असले तरी अद्याप अनेक भागात दमदार पावसाचा लपंडाव सुरू असल्याचे चित्र आहे.

नाशिक – मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेला असला तरी आणि काळ्या ढगांनी आकाश व्यापण्यात येत असले तरी अद्याप अनेक भागात दमदार पावसाचा लपंडाव सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १८ जुलैपर्यंत सर्वसाधारणपणे ३५३.८ मिलीमीटर पाऊस पडतो. या वर्षी २२३.८ मिलीमीटर म्हणजे केवळ ६३.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ५७७.१ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत दुपटीहून अधिक पाऊस झाला होता. यंदा मात्र त्या विपरित चित्र असून सिन्नर, नाशिक, नांदगाव, चांदवडसह त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीतही सरासरी (सर्वसाधारण) तुलनेत निम्म्याच्या आसपास पावसाची नोंद आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

अल निनोच्या प्रभावाने लांबणीवर पडलेल्या पावसाचा जुलैच्या उत्तरार्धातही लहरीपणा कायम आहे. घाटमाथ्याचा परिसर वगळता अनेक भागात त्याने दमदार हजेरी लावलेली नाही. अधुनमधून रिमझिम, मध्यम स्वरुपात तो येतो आणि गायब होतो. हवामान विभागाने १९ ते २२ जुलै या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही रिमझिम सरींव्यतिरिक्त पाऊस होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे. यंदा अनेक भागात पाऊस हुलकावणी देत आहे. दमदार पावसाअभावी पेरण्यांना विलंब होत आहे. नांदगाव तालुक्यातील काही भागातील रखडलेल्या खरीप पेरण्या पाऊस झाल्याने शेतकर्यांनी सुरू केल्या आहेत. पण तीन दिवसापासून पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. बुधवारपासून पुष्य नक्षत्राला प्रारंभ होत आहे. या नक्षत्रात तरी दमदार पावसाने मागील कसर भरून निघावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

काही अपवाद वगळता सर्वच तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यात आतापर्यंत १४५.७ मिलीमीटर (सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ८१.७ टक्के), बागलाण १३२.६ मिलीमीटर (७१.७ टक्के), कळवण २२०.३ मिलीमीटर (९० टक्के), नांदगाव १०३.४ (५६.३ टक्के), सुरगाणा ५७६.९ (८३.२ टक्के), नाशिक १४७,६ (५२.२ टक्के), दिंडोरी २८४.४ (१११ टक्के), इगतपुरी ६४१.५ (५५.३ टक्के), पेठ ५४०.३ मिलीमीटर (७४.३), निफाड १२८.४ मिलीमीटर (७८.१ टक्के), सिन्नर १०१.३ मिलीमीटर (५०.२ टक्के), येवला १४०.१ मिलीमीटर (७८.५ टक्के), चांदवड १०८ मिलीमीटर (५२.१), त्र्यंबकेश्वर ४९० मिलीमीटर ((५९.१ टक्के) आणि देवळा तालुक्यात १२१.४ मिलीमीटर म्हणजे (७६ टक्के) पाऊस झाला आहे. दिंडोरी वगळता अन्य एकाही तालुक्यात सरासरी इतका पाऊस झालेला नाही. घाटमाध्यावरील पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या पावसाच्या क्षेत्रात सर्वसाधारणच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.