नाशिक जिल्ह्यात ६६ दारू अड्ड्यांवर एकाचवेळी छापे; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक जिल्ह्यातील ६६ गावठी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक – जिल्ह्यातील ६६ गावठी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ३१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुरुवारी पहाटे पाच वाजता सुमारे ५५० अधिकारी आणि अंमलदारांनी नाशिक ग्रामीण हद्दीत गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी ६६ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत सुमारे ११ लाखांची तयार गावठी दारू, रसायन आणि इतर साधनसामग्री जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. या छापासत्रात सटाण्यातील सात, कळवणमधील पाच, वाडीवऱ्हे, घोटी, जायखेडा येथील प्रत्येकी चार, देवळा, इगतपुरी, सिन्नर एमआयडीसीतील प्रत्येकी दोन आणि पेठमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारू गाळप करणाऱ्या ठिकाणांसह रसायन बनविण्यासाठी लागणारा गुळ देणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई केली आहे.

हे वाचले का?  द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक

जिल्ह्यातील डोंगरदऱ्या, नदी-नाल्यांलगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू अड्ड्यांवरही छापे टाकण्यात आले. या कारवाईत देवळा तालुक्यातील चिंचे गावातील पाझर तलावाच्या काठावर लोखंडी पाईप, पंखा आणि बॅटरीच्या सहाय्याने भट्टीला अतिरिक्त हवा देण्याचे घरगुती यंत्र हस्तगत करण्यात आले. अवैध व्यवसायासंबंधी माहिती मिळाल्यास नागरिकांनी ६२६२२५६३६३ या मदतवाहिनीवर कळवावे, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा