नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मतदानात ६.५२ टक्क्यांनी वाढ होऊन ते ६९.१२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

नाशिक : मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मतदानात ६.५२ टक्क्यांनी वाढ होऊन ते ६९.१२ टक्क्यांवर पोहोचले आहे. गतवेळी ही टक्केवारी ६२.६० टक्के इतकी होती. वाढीव मतदानात ५.७४ टक्के पुरुष तर, १०.११ टक्के महिला मतदारांचा समावेश आहे.

बुधवारी १५ मतदारसंघात ४९२२ केंद्रांवर पार पडलेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक यंत्रणेकडून मतदान संपल्यानंतर सुमारे २३ तासांनी म्हणजे गुरुवारी दुपारी साडेचार वाजता जाहीर करण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांसह प्रशासनाने केलेल्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील मतदानात लक्षणीय वाढ करण्यात यश मिळाले. निफाड वगळता उर्वरित १४ मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २.२७ ते ११.९९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यावेळी सर्वच मतदारसंघात महिला उत्स्फुर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात एकूण १८ लाख ४१ हजार ३८१ पुरुषांनी तर १६ लाख ५६ हजार ८२९ महिला आणि ४८ तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले.

हे वाचले का?  नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत

जिल्ह्यातील एकूण ५० लाख ६१ हजार १८५ पैकी ३४ लाख ९८ हजार २५८ मतदारांनी मतदान केल्याचे निवडणूक शाखेने म्हटले आहे. २०१९ मध्ये ४५ लाख ४४ हजार ६५५ पैकी २८ लाख १८ हजार ४ मतदारांनी मतदान केले होते. याचा विचार करता यावेळी मतदान करणाऱ्यांचा आकडा सहा लाख ८० हजार २५४ ने वाढला आहे.

महिला आघाडीवर

यावेळी सर्वच मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदानाची टक्केवारी गतवेळेपेक्षा वाढली. ज्या निफाड विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहिशी कमी झाली, तिथेही महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का ०.३६ ने वाढला आहे. महिला मतदारांंच्या वाढीचे हे प्रमाण इगतपुरीत सर्वाधिक १३.६८ टक्के आहे. नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, येवला, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, नाशिक पूर्व, नाशिक मध्य व देवळाली या मतदारसंघात १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मालेगाव बाह्य, कळवण, निफाड, नाशिक पश्चिम या चार मतदारसंघात तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

मतदारसंघनिहाय वाढीचा आलेख

मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची सर्वाधिक टक्केवारी इगतपुरी मतदारसंघात (११.९९ टक्के ) वाढली. त्या खालोखाल नांदगावमध्ये (१०.८७ टक्के), नाशिक मध्य (९.२८), सिन्नर (९.००), येवला(८.७३), देवळाली (८.५८), मालेगाव बाह्य (८.४०), दिंडोरी (८.३९), बागलाण (८.२१), चांदवड (८.००), नाशिक पूर्व (७.९७), कळवण (५.८८), नाशिक पश्चिम (२.३७), मालेगाव मध्य (२.२७) टक्के अशी वाढ झाली आहे. निफाड या एकमेव मतदार संघात गतवेळच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी कमी मतदान झाले.

मतदारसंघनिहाय टक्केवारी (कंसात २०१९ मधील टक्केवारी)

नांदगाव – ७०.७६ (५९.८९)

मालेगाव मध्य – ६९.८८ (६७.३५)
मालेगाव बाह्य – ६७.७५ (५९.३५)

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

बागलाण – ६८.१५ (५९.९४)
कळवण – ७८.४३ (७२.३५)

चांदवड – ७६.९३ (६८.९३)
येवला – ७६.३० (६७.५७)

सिन्नर – ७४.८५ (६५.८५)
निफाड – ७४.१२ (७५.१३)

दिंडोरी – ७८.०५ (६९.५०)
नाशिक पूर्व – ५८.६३ (५०.६६)

नाशिक मध्य – ५७.६८ (४८.४०)
नाशिक पश्चिम – ५६.७१ (५४.३४)

देवळाली – ६३.३९ (५४.८१)
इगतपुरी – ७६.३३ (६४.३४)