नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस काही महिन्यांपासून दररोज अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनने मध्य रेल्वेला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

नाशिक – पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस काही महिन्यांपासून दररोज अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनने मध्य रेल्वेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. यावर उपाययोजना न झाल्यास प्रवाशांना होत असलेल्या मानसिक व आर्थिक त्रासासाठी ग्राहक मंचाकडे दाद व नुकसान भरपाई मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

संघटनेच्या सल्लागार ॲड. क्रांती गायकवाड-कांबळे यांनी ही नोटीस दिली. याबाबत संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे आणि पदाधिकारी पाठपुरावा करीत आहेत. नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेस या दोन्ही मुंबईच्या लोकल रेल्वेप्रमाणे आंतरशहर (इंटरसिटी) दर्जाच्या महत्वाच्या गाड्या आहेत. काही महिन्यांंपासून त्या दररोज अर्धा ते पाऊण तास उशिरा धावत असल्याने नाशिकहून मुंबईला दररोज नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब होत आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई, भुसावळच्या रेल्वे प्रशासनाला निवेदन देत या रेल्वे गाड्या नियमितपणे वेळेत सोडण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, अपेक्षित परिणाम होत नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून मध्य रेल्वेला मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर संघटनेच्या कायदेशीर सल्लागार ॲड. क्रांती गायकवाड-कांबळे यांनी कायदेशीर नोटीस दिली.

हे वाचले का?  नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला

नोटिसीत अन्य समस्यांचाही उल्लेख

नोटिसीत पंचवटी एक्स्प्रेसचा हिंगोली जनशताब्दीशी संलग्न केलेला रेक व त्यामुळे येणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या. तसेच नांदेड- मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला मुंबई विभागात मिळणारी दुय्यम वागणूक व अपुरी आसन व्यवस्था याचा नाशिककरांना होणारा त्रास याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.