नाशिक: प्रवास न करताही टोल वसुली; शिंदे नाक्यावरील प्रकाराने नाहक भुर्दंड

टोल नाक्यांवरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांचा प्रवास झटपट होण्यासाठी बंधनकारक केलेल्या फास्टॅगचा प्रवास न करताही भुर्दंड सोसावा लागल्याचे उघड झाले आहे.

टोल नाक्यांवरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांचा प्रवास झटपट होण्यासाठी बंधनकारक केलेल्या फास्टॅगचा प्रवास न करताही भुर्दंड सोसावा लागल्याचे उघड झाले आहे. शहरातील एका वाहनधारकाने नाशिक-सिन्नर महामार्गावर आपल्या वाहनातून प्रवास केलेला नसतानाही शिंदे-पळसेच्या नाक्यावरून त्याच्या फास्टॅगवरून मोटारीचा ४० रुपये टोल कापला गेला. मोटार घरासमोर उभी असताना ती टोल नाक्यावरून मार्गस्थ कशी होईल, असा प्रश्न संबंधिताने केला आहे.

प्रवास न करताच फास्टॅग प्रणालीवरून झालेल्या टोल वसुली विरोधात प्रादेशिक परिवहन आणि महामार्ग प्राधिकरणाकडे दाद मागणार असल्याचे वाहनधारक प्रा. प्रतिमा पंडित वाघ यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे आय २० ही मोटार आहे. गंगापूर रस्त्यावर वास्तव्यास असणाऱ्या वाघ यांची मोटार मंगळवारी घरासमोर उभी होती. तथापि, पहाटे पाच वाजून दोन मिनिटांनी या मोटारीने नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे पळसे नाका ओलांडल्याचे दाखवित टोलपोटी ४० रुपये फास्टॅगशी संलग्न बँक खात्यातून कापले गेले. याचा लघूसंदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त झाल्यावर हा प्रकार वाघ यांच्या लक्षात आला. मोटार घरासमोर उभी आहे. सीसीटीव्ही चित्रण व छायाचित्रातून हे स्पष्ट होते. मोटार पहाटे नाशिक-सिन्नर महामार्गावर गेलेली नसताना टोल वसूल कसा झाला, असा प्रश्न त्यांना पडला.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

दोन वर्षांपूर्वी काहिसा असाच प्रकार घडला होता. औरंगाबाद शहरात सिग्नलच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल एक हजार रुपये दंड भरण्याचे ऑनलाईन चलन प्राप्त झाले होते. मोटार औरंगाबादमध्ये गेलेली नसतानाही नाहक दंड भरावा लागला होता, याकडे वाघ यांनी लक्ष वेधले. त्यामुळे फास्टॅगवरून टोल कपात झाल्याचा विषय गांभिर्याने घेऊन त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाचे ॲप डाऊनलोड केले. आपल्या मोटारीच्या क्रमांकाचे अन्य वाहन नोंदणीकृत आहे का, याची तपासणी केली. तेव्हा तशा क्रमांकाने आणखी वाहन नोंदणीकृत असल्याचे निदर्शनास आल्याचे वाघ यांनी सांगितले. एकाच क्रमांकाची दोन वेगवेगळी वाहने नोंदणीकृत असल्याचे उघड झाल्याने संशय बळावला आहे. वाहनास कुणी बनावट क्रमांक लावून भ्रमंती करीत असल्याची साशंकता व्यक्त होत आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

आरटीओची चौकशीची तयारी

उपरोक्त प्रकरणात वाहनधारकाने तक्रार केल्यास वाहन नोंदणी, फास्टॅग आदींची पडताळणी करण्याची तयारी प्रादेशिक परिवहन विभागाने दर्शविली आहे. प्रादेशिक परिवहनच्या प्रणालीवर सर्व बाबींची छाननी केली जाईल. काही तांत्रिक मुद्दे असल्यास आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. एकाच क्रमांकाचे दोन वाहने नसतात. कुणी बनावट क्रमांक वाहनावर लावतात. पण, अशा प्रकारात मूळ वाहनधारकाच्या खात्यातून टोल कपात होण्याचा प्रश्न नसतो. पडताळणीअंती यावर भाष्य करता येईल. संबंधित वाहनधारकास फास्टॅग कुठून मिळाला, हे बघावे लागणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वाहन जागेवर उभे असताना विहित मर्यादेपेक्षा अधिक गतिने ते चालविल्या प्रकरणी दंडाची नोटीस आल्याच्या काही तक्रारी या विभागाकडे येत आहेत.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

नाक्यावरून वाहन मार्गस्थ झाल्याशिवाय फास्टॅगवरून टोल कपात होणे शक्य नाही. तथापि, या संदर्भात वाहनधारकाला काही तक्रार असल्यास तो संबंधित नाक्यावरील छायाचित्रणाची मागणी करू शकतो. तसेच त्याला टोल नाक्यावरील वहीत तक्रारही करता येईल. याची दखल घेतली जाईल. – एन. एस. पालवे (कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग)