नाशिक-बेळगाव विमानसेवेची तयारी पूर्ण

सोमवारपासून आठवडय़ातून तीन दिवस सेवा

देशातील प्रमुख शहरांशी नाशिकला हवाई सेवेने जोडण्याच्या शृंखलेत आता कर्नाटक राज्यातील बेळगावचाही समावेश होणार आहे. स्टार एअर या कंपनीच्या वतीने

२५ जानेवारीपासून नाशिक ते बेळगाव ही थेट विमान सेवा सुरू होत आहे.  ५८० किलोमीटरचे हे अंतर या सेवेमुळे तासाभरात पूर्ण करता येईल. आठवडय़ातून तीन दिवस ही विमान सेवा असेल. उडान योजनेंतर्गत १९९९ रुपयांत प्रवास करता येणार आहे. शिवाय, १९ ते २५ जानेवारी या कालावधीत २५ ऑगस्ट २०२० पर्यंतच्या प्रवासाची आगाऊ नोंदणी करणाऱ्यांना १२०२ रुपयांत तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या नव्या विमान सेवेची माहिती संजय घोडावत ग्रुपचे विपणन प्रमुख राज एसी आणि विपणन अधिकारी शशिकांत एकरनाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

उडान योजनेंतर्गत नाशिक दिल्लीबरोबर देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांशी जोडले जात आहे. या विमान सेवेने उत्तर कर्नाटकशी ते जोडले जाणार आहे. सध्या नाशिक-बेळगाव प्रवासासाठी रस्तेमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. ५८० किलोमीटरचे अंतर पार करण्यास ११ ते १२ तासांचा कालावधी लागतो. हे अंतर आता केवळ एका तासावर येईल. स्टार एअर सेवेसाठी एम्ब्राएर विमानांचा वापर करते. मोठय़ा विमानांसारखी मोकळी जागा, आरामदायी आणि वेगवान सुरक्षित प्रवासाची अनुभूती या विमानातून मिळणार असल्याकडे एसी यांनी लक्ष वेधले.

नाशिक-बेळगाव विमान सेवा कार्यान्वित झाल्यानंतर पुढे ती आणखी कोणत्या शहरापर्यंत विस्तारता येईल याचा विचार केला जाणार आहे. नाशिक-बेळगाव विमान सेवेमुळे बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी तसेच गोवा या ठिकाणी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. ५० आसनी विमानात उडान योजनेंतर्गत प्रवासासाठी १९९९ रुपये तिकीट राहील. कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त आगाऊ नोंदणी करणाऱ्यांना १२०२ रुपयांत तिकीट दिले जाणार आहे. या विमान सेवेमुळे दोन्ही राज्यांतील व्यापार, उद्योगाला चालना मिळणार असल्याचा विश्वास एसी यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

आठवडय़ातून तीन दिवस सेवा

नाशिक ते बेळगाव ही विमान सेवा सोमवार, शुक्रवार आणि रविवार असे आठवडय़ातून तीन दिवस राहील. बेळगावहून दुपारी ४.४० वाजता विमान नाशिककडे उड्डाण करेल. नाशिक-बेळगाव विमान सायंकाळी सव्वा सहा वाजता मार्गस्थ होईल. ५० आसनांचे विमान या सेवेसाठी वापरले जाणार आहे. पुढील टप्प्यात ही सेवा अन्य शहरापर्यंत विस्तारण्याचा मानस असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद